Tuesday, January 22 2019 1:51 pm

थिम पार्क घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

ठाणे : थिम पार्कची पाहणी केल्यानंतर येथे मोठ्या  प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रशासन आिंण लोकप्रतिनिधींची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज थिम पार्कचा पाहणी दौरा केला. या दौर्‍यामध्ये थिम पार्कमधील अनेक त्रुटी द़ृष्टीस पडल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण, महेश साळवी, नगरसेविका अनिता किणे, राधाबाई जाधवर, अपर्णा साळवी, अंकिता शिंदे , आशरीन राऊत, सुलोचना पाटील आदी उपस्थित होते.
या दौर्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी,  या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मासुंदा तलावाच्या प्रतिकृतीमध्ये पाणीच शिल्लक नसल्याचे दिसून आले. तर, अनेक वास्तूंच्या प्रतिकृतीही व्यवस्थीत नसून केवळ पैसे लाटण्यासाठीच हे पार्क बनवण्यात आले आहे का, असा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील अधिकार्‍यांची निवडच अयोग्य आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा अहवाल आणण्यासाठी पालिकेचे अधिकारी कलाल यांनाच पाठवण्यात आले होते. कलाल यांचा या चौकशी समितीचे सदस्य आहेत. वास्तविक पाहता, या प्रकरणात त्यांच्यावर ठपका येण्याची शक्यता असतानाही त्यांना ज्या पद्धतीने या समितीमध्ये घेण्यात आले आहे. त्यावरुन या समितीची सत्यताच संभ्रमीत करणारी आहे. या समितीमध्ये गटनेत्यांना घ्यायचे असतानाही काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांना घेण्यात आलेले नाही. या प्रकरणात सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, याचीही माहिती देण्यात येत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, या प्रकरणात एका नेत्याला चेकने पैसे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची अँटीकरप्शन खात्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात आली पाहिजे. त्यासाठी पालिका प्रशासनाने तक्रार करावी, अशी मागणीही मिलींद पाटील यांनी केली.