ठाणे (01) – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100 टक्के इतकी भरीव सवलत जाहिर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या चार महिन्यांच्या कालावधीत या अभय योजनेचा लाभ पाणीपट्टी थकबाकीदारांना घेता येणार आहे. 31 मार्च 2023 पर्यतच्या थकीत पाणीपट्टी कराच्या दंडाची रक्कम पूर्णत: माफ करुन भरीव सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अशी ही योजना आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्याटप्यांनी भरता येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही याचीही दखल घ्यावयाची आहे. त्यामुळे 31 मार्च 2023 पर्यत नागरिकांनी आपली पाणी थकीत रक्कम भरणा करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती संयोजनधारकांनी पाणीपट्टी जमा केली असेल, अशा घरगुती नळसंयोजनधारकांना सदरची योजना लागू असणार नाही तसेच व्यावसायिक नळसंयोजन धारकांनाही ही सवलत लागू असणार नाही.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मीटर पद्धतीने 72,120 तसेच नॉन मीटर पद्धतीने 1,53,295 असे एकूण 2,25,415 इतक्या संयोजनधारकांना पाणी देयके आकारण्यात आली आहेत. यामध्ये रुपये 95.13 कोटी इतकी मागील थकबाकी असून त्यावर रुपये 38.79 कोटी इतका प्रशासकीय आकार (दंड) आकारण्यात आला आहे. पाणी देयके वसुलीपोटी विभागामार्फत आतापर्यत 4316 इतकी नळसंयोजने खंडीत केली असून 97 मोटर / पंप रुम्स सील करण्यात आले आहेत. अशा प्रकारची व यापेक्षा कठोर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी देयकाचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे व प्रशासकीय आकार (दंड) माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी पाणीपट्टी बिलाची देयके ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागसमिती कार्यालयात जमा करावीत. तसेच नॉन मीटर पद्धतीच्या पाणी देयकांसाठी महापालिकेच्या https://watertax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर तसेच मीटर पद्धतीसाठी https://tmcswmb.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.