Wednesday, August 12 2020 9:37 am

‘त्या’ बलात्काऱ्याला वैद्यकीय उपचार देऊ नका, वाचलाच तर चौकात फाशी द्या – मनसे

पनवेल : पनवेल येथे कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या बलात्काराचे पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा, त्यातूनही तो वाचलाच तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तसच बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाहीच अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला. विलगीकरण कक्षात एका ४० वर्षीय महिलेवर डॉक्टर असल्याचे सांगून बलात्कार केल्याची घटना १६ जुलै रोजी सायंकाळी घडली आहे. आरोपीवर तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोन गावात इंडिया बुल्स येथे कोविड केअरमध्ये पनवेल परिसरातील एका इसमाला चार दिवसांपूर्वी दाखल केले होते. या इसमाचा भाऊ जेवणाचा डबा घेऊन येत असे. त्यांच्या रूमच्या बाजूलाच खारघर परिसरातील एका चाळीस वर्षीय महिलाही दाखल होती. डबा देणाऱ्या त्या इसमाने त्या महिलेशी ओळख करून घेतली होती.

दरम्यान, त्यालाही लक्षणे जाणवल्याने तिथेच दाखल केले होते. गुरुवारी संध्याकाळी तो त्या महिलेच्या रुममध्ये गेला. आपण डॉक्टर असल्याचे सांगून काही समस्या आहेत का, असे विचारले. महिलेने अंग दुखत असल्याचे सांगताच मसाज करावा लागेल, असे सांगून त्याने महिलेला विवस्त्र केले व तिच्यावर अत्याचार केला.