नाशिक, 15 : सीमेवर शत्रूचा मुकाबला करताना भारतीय दलाचे सामर्थ्य दर्शविणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके काल नाशिकमध्ये लष्कराच्या देवळाली छावणीच्या फायरिंग रेंज येथे झाली.
तोफ खाना दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय बनावटीच्या 120 एम एम मॉर्टेर तोफेसह , 105 एमएम इंडियन फिल्ड गन , रशियन इस्रायली बनावटीच्या ओरिजनल आणि भारतीय सैन्याने आणि उद्योजकांनी आधुनिकीकरण केलेल्या तोफा, भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या तोफा, आधुनिक बोफोर्स वज्र धनुष, अलीकडे सैन्यात दाखल झालेले पिनाका गरुडा आदी रॉकेट सिस्टीम यांनी 9 ते 11 किलोमीटर अंतरावरील लक्षावर अचूक मारा करून निशाणा साधला. यावेळी तोफखाना दरामध्ये असणारे हेलिकॉप्टर चे महत्व दाखविणारी हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .
भारतीय तोफखाना दलाच्या सामर्थ्याच्या सार्थ अभिमान वाटत असल्यामुळे ही प्रात्यक्षिक पाहण्यासाठी, युद्ध भुमीवरील थराराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सैन्याच्या अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही उपस्थिती लावून लक्षावर अचूक मारा करणाऱ्या तोफखाना दलाच्या जवानांच्या कौशल्याला टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद दिला. भारतीय लष्कर शेजारच्या काही मित्र राष्ट्रांच्या लष्करी अधिकाऱ्यांना ही लष्करी प्रशिक्षण देत आहे अशा नेपाळसह अन्य मित्रराष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आज नाशिकच्या फायरिंग रेंजमध्ये उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकांना उपस्थित असलेले अति विशिष्ट सेवा मेडल ने सन्मानित लेफ्टनंट जनरल एस हरी मोहन अय्यर यांनी तोफखाना दलाच्या प्रात्यक्षिकानंतर मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकाला लष्करी अधिकाऱ्यांबरोबर अनेक मुलकी अधिकारी, जवानांचे कुटुंबीय, विशेषता तरुण-तरुणी आणि शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी , लष्करी अधिकारी आणि जवान, त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.