Monday, June 17 2019 4:05 am

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकाराने एक धाव एड्सच्या रुग्णांसाठी

नवी मुंबई : मोबाईलवरील स्टेटस पाहण्यापेक्षा नो  युअर स्टेटस म्हणेजच  आपले स्वतःचे स्टेटस जाणून घ्या हे ब्रीदवाक्य यावर्षीच्या एड्सदिनाचे होते. १ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या वतीने या महिन्यात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले असून काल रविवारी ९ डिसेंबर रोजी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स इन इकॉनॉमिक अँड कमर्शियल सायन्सस यांच्या मदतीने नेरुळ ते सिवूड्स  ५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन आयोजित केली होती. या मॅरॅथॉनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या दोनशे तरुण -तरुणींनी तसेच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सत्तर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. एड्‌सविषयी जेवढे गैरसमज आपल्या समाजात आहेत, तितक्या इतर कुठल्याही रोगाविषयी नसतील. त्यात या रोगावर अजूनही औषध-लस नसल्याने लोकांमध्ये अजूनही भीती आहेच. एड्‌सग्रस्त रुग्णाला तुच्छतेची वागणूक दिली जाते म्हणूनच या रोगाविषयी समाजामध्ये जास्त चर्चा झाली पाहिजे या हेतूनेच या मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती ही नक्कीच दिलासादायक घटना असल्याचे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले. एड्‌सपासून नागरिकांनी दूर राहावे म्हणून सरकारने विविध माध्यमांतून जनजागृतीपर कार्यक्रम, उपक्रम राबवित असल्यामुळे मागील काही वर्षांपासून एड्‌स बाधितांचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, तरीही राज्यात दररोज ३४ रुग्णांची भर पडत असून, दुसरीकडे दिवसाला सात रुग्णांचा मृत्यू एड्‌समुळे होत असल्याचेही समोर आले आहे. राज्यात २०१० ते २०१८ या काळात एक लाख सहा हजार ९३ जणांना एड्‌सची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीतू राज्यातील पुणे, सोलापूर, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एड्‌सग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून फक्त जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रम न घेता संपूर्ण वर्षभर तरुणांमध्ये या रोगाविषयी जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत या मॅरेथॉनमध्ये  सहभागी झालेल्या नवी मुंबईतील नागरिकांनी व्यक्त केले.