Friday, May 24 2019 9:29 am

तेजस्विनी बस अखेर कधी ?

ठाणे : ठाणे परिवहनसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे आणि मुंबईत महिलांसाठी खास अशा तेजस्विनी बस  मागील वर्षी दाखल होणार होत्या. परंतु, अद्यापही त्याचे सकारत्मक चिन्हे दिसत नयेत. ठाणे आणि नवी मुंबईच्या ताफ्यात त्या येणाऱ्या वर्षात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते.

इतर महापालिकांनी या बसची तयारी जोरात सुरू केली असली, तरी राज्य शासनाकडून रंगसंगती आणि त्या बसवर कोणते छायाचित्र असावे, यावरून मागील चार ते पाच महिने चर्चेचे गुºहाळ सुरू होते. आता दोन दिवसांपूर्वीच यावर तोडगा निघाल्याने तेजस्विनीचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रक्रियाच अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र बस उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बसयोजना सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षीच घेतला आहे . त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० बस मिळणार आहेत.यापैकी ५० बस ठाणे शहराला मिळणार असून नवी मुंबईला १० आणि इतर महापालिका मिळून अशा ३०० बस दाखल होणार आहेत.