मुंबई, 4 : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर राज्यस्तरासोबतच विभागीय तसेच जिल्हास्तरीय अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्याच्या आत करण्यात येईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मंत्री श्री.देसाई बोलत होते.
मंत्री श्री.देसाई म्हणाले, तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून या समूहासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध योजना एकत्रितपणे कशा राबवता येतील याचा विचार करण्यात येणार आहे. समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समाज घटकासाठी आरोग्य तपासणीसाठी एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचा ३२७५ तृतीयपंथीयांना लाभ झाला आहे. त्यांना नवीन शिधापत्रिका सुलभतेने मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. पोलिस पदासाठीच्या ऑनलाईन अर्जामध्ये पुरुष, महिला बरोबरच तृतीयपंथी उमेदवारांसाठीही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
गृह विभागामार्फत आजच पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून सर्व पोलिस स्टेशनमध्ये सूचना देण्यात येईल की पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या तृतीयपंथीयांना इतर नागरिकांप्रमाणेच चांगली वागणूक देण्यात यावी. असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, अनिल देशमुख, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.