Monday, June 1 2020 1:02 pm

तुर्भे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे लोकार्पण

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे रुळावरील नवीन पादचारी पुलाचे लोकार्पण रविवारी पार पडले. या पुलासाठी एकूण सहा कोटी ८४ लाख रुपये खर्चआल असून पालिकेच्या निधीतून रेल्वेप्रशासनाने हा पूल बांधला आहे. प्रवासी रूळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यात असते त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी हा पुल बांधण्यात आला आहे. जनता मार्केट व तुर्भे नाका हा  परिसर विभागला असल्यामुळे या दोन्ही विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांकडून रस्ता तसेच रूळ ओलांडला जात होता. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पूल उभारून रस्ता ओलांडणाºया प्रवाशांची गैरसोय दूर केली होती; परंतु रेल्वेरुळावर पूल नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा मृत्यूच्या दाढेखालून प्रवास सुरूच होता.

रविवारी त्याचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, निशांत पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पूल वाढवून तो रेल्वेरुळावरून जनता मार्केटला जोडावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविका बेबी पाटील यांनी रेल्वे प्रशासनासह पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील यांनीही सदर मागणीवर जोर दिला होता. त्यानुसार खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे प्रशासनाला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती; परंतु केवळ रेल्वे प्रवाशांसाठीच पादचारी पूल अथवा भुयारीमार्ग बांधण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत होते, यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ ओलांडावा लागत होता. याकरिता त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भिंतीलाही भगदाड पाडण्यात आलेले आहे. अखेर पादचारी पुलासाठी लागणारा खर्च देण्याची पालिकेने तयारी दर्शवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तर आमदार संदीप नाईक यांनीही अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडून त्या ठिकाणी पादचारी पूल आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.