Tuesday, December 1 2020 1:32 am

तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

रत्नागिरी:  जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीनं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ५ कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राउत यांच्याकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सिद्धिवनायक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निधी देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन अध्यादेशानुसार ५ कोटी रूपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राउत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाधक्ष सुमंत घैसास, विश्वस्त संजय सावंत, गोपाळ दळवी उपस्थित होते. सिद्धिविनायक ट्रस्टने केलेल्या या मदतीबद्दल पालकमंत्री आणि खासदारांनी बांदेकर आणि विश्वस्तांसह ट्रस्टचे रत्नागिरीवासियांच्यावतीने आभार मानले…!