Wednesday, June 3 2020 10:37 am

तिरुपती बालाजीचा अर्ध्या किंमतीतला प्रसाद घेण्यास भाविकांची गर्दी

तिरूपती: कोरोना प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सुरु असला तरी काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदीर प्रशासनाने भक्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

मंदीराचा प्रसाद सोमवारपासून अर्ध्या किंमतीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती देवस्थान ट्रस्टतर्फे लवकरच याची सुरुवात होणार आहे. यानुसार भक्तांना ५० रुपयात मिळणारा लाडू प्रतिनग २५ रुपयांमध्ये मिळणार आहे. 

एखाद्या भाविकाला १ हजारपेक्षा अधिक लाडू पाहीजे असतील तर त्याने आपले नाव, मोबाईल नंबरसह तपशिल पाच दिवस आधी tmlbulkladdus@gmail.com वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांच्या मागणीनुसार लाडू बनविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी १८००४२५४१४१ किंवा १८००४२५३३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

तिरुमला तिरुपती देवस्थानकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार व्यंकटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिर प्रशासनाकडून प्रसाद स्वरुपात देण्यात येणारा तिरुपती लाडू मोफत देण्यात येणार होता. पण कोरोना संकटानंतर इथली परिस्थिती संपूर्ण बदलली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान अर्थात TTD कडून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदिर प्रशासनाला जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.