नागपूर, 18 : मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याबाबत अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील गावांना लाभ होणार असल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य समाधान अवताडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. राठोड म्हणाले की, या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी, तंडोर, सिध्दापूर, माचनूर आणि ब्रह्मपुरी तर मोहोळ तालुक्यातील आरबली, मिरी, बेगमपूर, घोडेश्वर, येनकी आणि दक्षिण सोलापूरमधील वडापूर या गावांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या बंधाऱ्यात ५०० दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरातील ५२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.