Tuesday, December 1 2020 2:32 am

तांबडी येथील हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालणार

रोहा : तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँँड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन  मुलगी बेपत्ता झाली होती. २६ जुलैला तिचा मृतदेह ताम्हणशेत जवळील ओहळाजवळ आढळून आला होता. लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभुमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि पोलीस तपासाचा आढावा घेतला.

यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी या संपूर्ण खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याची घोषणा केली. यावेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. तांबडी येथील घटना दुर्दैवी आहे. लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.