Wednesday, February 26 2020 10:12 am

.. तर मृतदेह ठामपाच्या दारात आणून ठेवेन – राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांचा इशारा

ठाणे : मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्युचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेहाला घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्युचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप मुंब्रा-कौसा भागातील नागरिक करीत आहेत. त्यामुळे जर ही समस्या ठाणे पालिका प्रशासनाने तत्काळ दूर केली नाही. तर, मृतदेह घेऊन ठाणे पालिका मुख्यालयाच्या दारात उभा राहिन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिला.
ठाणे महानगर पालिकेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये शानू पठाण यांनी मुंब्रा भागात मयत झालेल्यांना मृत्युचे प्रमाणपत्र देण्यास स्थानिक डॉक्टरांना टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा चर्चेला आणला.
मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करुन डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो अशा लोकांनाही मृत्युचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत असते. काही वेळा तर हजारो रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते. या सर्व प्रकाराला ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य खाते जबाबदार असल्याची तक्रार मुंब्रावासीय करीत आहेत. त्यामुळे जर ही समस्या निकाली काढली नाही तर मृतदेहाचा ‘जनाजा’ घेऊन आपण ठाणे महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावरच येऊ; अन् त्यानंतर होणार्‍या परिणामांना ठामपा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला.
शानू पठाण यांच्या या इशार्‍यानंतर स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी ही समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी, येत्या आठवड्यामध्ये ठामपा आरोग्य अधिकारी डॉ. वाळवीकर आणि मुंब्रा-कौसा येथील डॉक्टरांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असून त्यामध्ये या डॉक्टरांना पालिकेच्या वतीने मृत्युचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील, असे सांगितले.