मुंबई : कवींनी पेशन ठेवला पाहिजे,विचार केला पाहिजे, घाई न करता कवितेची उपासना करीत राहिले पाहिजे. ती उपासना करताना गांभीर्यपूर्वक करावी. तर, उथळपणा कविता क्षेत्रात योग्य नाही. असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांनी शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना घाई करणाऱ्या कवींना दिला. याचदरम्यान त्यांनी कवी मंडळींनी उपासनेचा विचार ठेवला तर, भविष्यात मिळणाऱ्या कविता अधिक खोल, आशय आणि अर्थपूर्ण असतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते.
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहामध्ये शनिवारी कवयित्री वंदनाताई बिरवटकर लिखित काव्य वंदना आणि हृदन या दोन्ही काव्यसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर,शिक्षणतज्ञ् व साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर, गझलकार ए. के. शेख, कवयित्री प्रतिभा सराफ, संघांचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, काव्यसंग्रहच्या कवयित्री वंदनाताई बिरवटकर यांच्या उपस्थित पार पडला. दरम्यान, आपल्या भाषणातून सल्ला देताना, सासणे यांनी कविता देवतेची एक गोष्ट सांगितली, पण, तो क्षण आल्यावरच कविता देवी तुम्हाच्यावर प्रसन्न होईल,असेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कवयित्री वंदना बिरवटकर यांचे कौतुक केले.
वृत्तवाहिन्याच्या मागे भाषिक पत्रकारिता रडखडत चालली आहे – सुकृत खांडेकर
सध्याच्या पत्रकारितेत सामाजिक दृष्टिकोनाला बगल देण्यात येत असून वस्तुनिष्ट पत्रकारिता हरवत चालली आहे. आज वृत्तवाहिन्याच्या मागे अनेक भाषिक पेपर रडखडत चालल्याचे दुःख असह्य होत असल्याचे मत दैनिक प्रहार चे संपादक श्री. सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले आहे. मुंबई येथील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभामध्ये ते बोलत होते. या समारंभामध्ये मुंबई येथील जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना आचार्य बालशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, नांदेड येथील दैनिक एकजूट चे संपादक धोंडोपंत विष्णुपुरीकर यांना यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार आणि सुरेश गोपाळे यांना जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. राज्यातील गुणवंत पत्रकार आणि कवी यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केल्याबद्दल खांडेकर यांनी एकनाथ बिरवटकर आणि वंदनाताई बिरवटकर यांचे विशेष कौतुक केले.