Thursday, January 28 2021 6:39 am

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांवर बंदची टांगती तलवार

डोंबिवली :- डोंबिवली शहरात असलेल्या  एमआयडीसीमधील कंपन्यांवर बंदची टांगती तलवार बसली आहे. या कंपन्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यातून कपड्याचे आणि प्लास्टिकचे तुकडे आणि कंपन्यांत तयार होणाऱ्या वस्तूंचे तुकडे मोठ्या प्रमाणात  वाहून येत आहेत. एमआयडीसीच्या चेंबरमध्ये हा कचरा अडकून रसायनमिश्रित सांडपाणी चेंबरमधून रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास बाधा होत आहे. यामुळेच या कंपन्यांना एमआयडीसीने दूषित सांडपाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे न सोडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात  असलेल्या ७०० कारखान्यातील १५०  रासायनिक तर ११० कापड उद्योग कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांना डोंबिवली एमआयडीसीकडून धाडण्यात आलेल्या नोटिशीमध्ये दूषित सांडपाणी कंपन्यांनी बंदिस्त पाइपलाइनद्वारे प्रक्रिया केंद्रात न सोडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमधून कंपन्यांमधील धागे, कापडी वस्तू, मातीमिश्रित पाणी वाहून येत असून या वस्तूंमुळे नाल्यात सांडपाणी साचते. हे सांडपाणी चेंबरमधून बाहेर पडत आहे. या सांडपाण्यातून कंपन्यांच्या आवारात पडणारे पावसाचे पाणीदेखील एकत्र करून सोडले जात असून यामुळे नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतो. अरुंद नाल्यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रसायनमिश्रित सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागते. यामुळे कंपन्यांमधील सांडपाणी बंदिस्त पाइपलाइनमधून सोडताना त्यात कोणत्याही प्रकारचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण करणारे घटक नाहीत ना, याची खबरदारी घ्यावी अन्यथा अशा कंपन्यांवर लक्ष ठेवून त्या बंद करण्यात येतील, असा सज्जड इशारा एमआयडीसीने दिला आहे. मागील वर्षभरापासून या तक्रारी एमआयडीसीकडे केल्या जात होत्या. मात्र एमआयडीसीकडून प्रथमच इतकी गंभीर दखल घेण्यात आली आहे.