Wednesday, March 26 2025 3:36 pm

डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना शिवणयंत्र व घरघंटीचे वाटप

ठाणे 21 : महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा किंबहुना त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेतंर्गत कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील एकूण 2787 पात्र महिलांना शिवणयंत्र व घरघंटीचे प्रातिनिधीक स्वरुपातील वाटप मंगळवारी (20 फेब्रुवारी) खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार यंत्रसामुग्री वाटप योजनेचा कार्यक्रम खारेगांव नाका येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त वर्षा दिक्षीत, माजी स्थायी समिती सभापती गोपाळ लांडगे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, अशोक भोईर, माजी नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, राजन किणे, दर्शना म्हात्रे, मंगल कळंबे, पूजा करसुळे, जितेंद्र पाटील, अमर पाटील, अनिता किणे, दिपाली भगत, अनिता गौरी, प्रियांका पाटील, विजया लासे, लता पाटील महिला व बालकल्याण अधिकारी दयानंद गुंडप, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महिलांना स्वयंरोजगारास चालना मिळणे, महिलांचे जीवनमान सुधारणे व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणे, महिलांना रोजगार उपलब्‌ध करुन त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. सदरची योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत सुरू केली, त्याच धर्तीवर ठाण्यातील महिलांनाही याचा लाभ व्हावा यासाठी ही योजना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी योजना, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच विविध योजना आणण्याचे काम राज्यशासनाने केले असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. महिलांनी घरी राहून शिलाई मशीन तसेच घरघंटीच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय या योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात कळवा, मुंब्रा, दिवा या विभागातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून ठाणे शहरातील महिलांना लवकरच याचे वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेतंर्गत आज कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील एकूण 2787 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कळवा विभागातील एकूण 543 महिला शिवणयंत्रासाठी तर 590 महिला या घरघंटीसाठी पात्र ठरल्या आहेत. मुंब्रा विभागातील 508 महिला या शिवणयंत्रासाठी तर 407 महिला या घरघंटीसाठी पात्र ठरल्या आहेत. तर दिवा विभागातील 363 महिला शिवणयंत्रासाठी तर 376 महिला घरघंटीसाठी पात्र ठरल्या आहेत. एकूण 1414 महिलांना शिवणयंत्र तर 1373 महिलांना घरघंटीचे वाटप केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. या योजनेसाठी अर्जदारांकडून ठामपा हद्दीत राहत असल्याचा तहसीलदार यांचेकडील वास्तव्याचा दाखला, अर्जदार महिलेसाठी 18 ते 60 वर्ष वयोमर्यादार, पिवळया/ केशरी रंगाच्या शिधापत्रिकेची छायांकित प्रत , आधारकार्ड, पॅनकार्ड, वयाचा पुरावा, स्वयंघोषणापत्र हे निकष ठेवण्यात आले होते. या निकषास पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मशीन मोफत मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन होणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघे स्वयंराजगार योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक अर्ज आले होते, या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुख्यमंत्र्यांनीही यास सकारात्मकता दर्शवित या योजनेत पात्र ठरलेल्यांची लॉटरी पध्दतीने निवड न करता सरसकट पात्र महिलांना लाभ मिळणार असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्‌या महिलांनी शिवणयंत्र व घरघंटीच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत असे माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले. कार्यक्रमास कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.