Tuesday, June 2 2020 4:21 am

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील लिफ्ट तातडीने दुरूस्त करावी साफसफाईसह इतर सुविधांकडे लक्ष द्यावे – महापौर नरेश म्हस्के

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सिनेदिग्दर्शक विजू माने आज लिफ्ट मध्ये अडकल्याची घटना घडल्याप्रकरणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱी यांची महापौर दालनात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत नाट्यगृहातील लिफ्ट (उद्वाहक) तातडीने कायमस्वरुपी दुरूस्त करणे, नाट्यगृहातील प्रमुख सभागृहासह मिनी थिएटर, तालीम हॉल, लॉबी, पार्किंग या ठिकाणची नियमित साफसफाई राहिल यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.

या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक नरेश मणेरा, सिध्दार्थ ओवळेकर, साधना जोशी, शर्मिला गायकवाड, नम्रता पमनानी, नम्रता फाटक तसेच प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपआयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रविंद्र खडताळे, कार्यकारी अभियंता विनोद गुप्ता, उपअभियंता शैलेश हर्डीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात समस्यांची मालिका प्रत्येक महिन्यात सुरू आहे. याबाबत रंगकर्मी तसेच नाट्यप्रेमींच्या देखील वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. आज सकाळी सिनेदिगदर्शक विजू माने हे दहा मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले असले तरी असा प्रकार वारंवार घडू नये व भविष्यात याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

सदर बैठकीत साफसफाईचा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. साफसफाईसाठी नाट्यगृहात अपुरा कर्मचारी असल्याचे निदर्शनास येत असून या ठिकाणी तातडीने तीन शिफ्टमध्ये पुरेसा असा कर्मचारी वर्ग नेमावा यासाठी प्रशासनाने ताबडतोब कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी महापौर यांनी दिल्या. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई दिसून आल्यास तेथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले. ठाणे हे सांस्कृतिक उपराजधानी असून डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह व राम गणेश गडकरी रंगायतन येथे दररोज दोन हजाराहून अधिक रसिक येत असतात. रसिकांच्या दृष्टीने मुलभूत सोईसुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असून यामध्ये कोणतीही हयगय कामा नये अशा सूचना देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महापालिकेचे काही अधिकारी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई करीत असल्याचे अतिरिक्त आयुकत समीर उन्हाळे यांनी मान्य केले.

तसेच गडकरी रंगायतनमध्ये सुध्दा शौचालयांची साफसफाई, मुख्‍य सभागृहातील साफसफाईकडे तातडीने लक्ष घालण्याचे आदेशही यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिले.ठाणे महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन हे विकासाच्या दृष्टीने अनेक विकासकामे तसेच चांगल्या सुविधा ठाणेकरांना उपलब्ध करुन देत असतात. परंतु महापालिकेचे काही अधिकारी हेतुपुरस्सर कामात दिरंगाई करुन महापालिकेची नाहक बदनामी करीत आहे असा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केला. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी प्रशासनाला दिले.