ठाणे (२४) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली आणि देशभरातून २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ठाणेकर डॉ. कश्मिरा संखे हिचे ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बुधवारी अभिनंदन केले. तसेच, तिला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यूपीएससी सारख्या नामांकित स्पर्धा परिक्षेत ठाणे जिल्ह्यातील एक मुलगी राज्यात प्रथम आली ही अतिशय भूषणावह गोष्ट आहे. त्यातून अनेक तरुण-तरुणींना स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
ठाण्यातील श्रीनगर भागात राहणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे, त्यांचे वडील किशोर संखे, स्थानिक माजी नगरसेवक गुरुमुखसिंग स्यान यांनी आयुक्त श्री. बांगर यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली.
डॉक्टरी पेशा सांभाळून युपीएसी परीक्षेची तयारी केल्याबद्दल आयुक्त श्री. बांगर यांनी कश्मिराचे कौतुक केले. स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा हा योग्य दृष्टीकोन आहे. ठोस पर्याय हाती ठेवूनच स्पर्धा परिक्षेची तयारी करणे योग्य असल्याचे आयुक्तांनी याप्रसंगी सांगितले.
डेंटिस्ट असलेल्या बहिणीला क्लिनिकमध्ये गेली दीड वर्षे मदत करतच आपण परीक्षेची तयारी केली. प्रिलिम यशस्वी झाल्यावर अभ्यासाचा वेळ वाढवत नेला. मेहनत केली. त्याला यश मिळाल्याचा आनंद आहे. नागरी सेवेत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. देशभरात कोठेही काम करण्याची संधी मिळाली तरी आपण पूर्ण समर्पण भाव ठेवून काम करू, अशी भावना डॉ. कश्मिरा हिने व्यक्त केली.
परिक्षेसाठी निवडलेला विषय, तयारी, अभ्यास पद्धती, मुलाखतीतील कामगिरी आदींबद्दल आयुक्त श्री. बांगर यांनी चौकशी केली. ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत मार्गदर्शनासाठी वेळ द्यावा, अशी सूचनाही यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी डॉ. कश्मिरा हिला केली. आपल्यासारखीच एक व्यक्ती युपीएसी परीक्षेत चांगल्या रँकिंगने उत्तीर्ण होऊ शकते, हा विश्वास तेथील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यास उपयुक्त ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता असते, असे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
कश्मिरा हिने पूर्णपणे स्पर्धा परिक्षेवर लक्ष केंद्रीत करावे, अशी तिच्या कुटुंबियांची इच्छा होती. मात्र, कश्मिराने व्यावसायिक विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण करून मगच या परिक्षेला सामोरे जायचे असा निर्धार केला होता, असे कश्मिराचे वडिल किशोर संखे यांनी सांगितले. किशोर संखे हे एका कंपनीत उपाध्यक्ष असून आई प्रतिमा याही वैद्यक व्यवसायात आहेत.