Friday, May 24 2019 9:00 am

डॉ.आंबेडकरांच्या विचारांची परंपराच देशाला पुढे नेणार आहे – आ. केळकर

ठाणे : भगवान गौतम बुध्दांनी दिलेले विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने भारताला दिले. हीच परंपरा  देशाला प्रगतिपथावर नेणार आहे’, असे प्रतिपादन आ. संजय केळकर यांनी केले.ठाण्याचे आ. संजय केळकर यांच्या आमदार निधीतून आझादनगर 1 मध्ये उभारलेल्या  समाजमंदिराचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी श्री.केळकर बोलत होते. ‘गेली 15 वर्षे रखडलेले समाजमंदिराचे काम बौध्द नागरिक सेवा मंडळाने माझ्याकडे मागणी केल्यानंतर तातडीने मार्गी लावले. या कामी स्थानिक नगरसेवक मिलिन्द पाटणकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर नगरसेवक कृष्णा पाटील, नगरसेविका नंदा पाटील, नगरसेविका दिपा गावंड यांचीही महत्वाची भूमिका राहिली. हे समाजमंदिर ठाण्यातील उत्कृष्ट समाजमंदिर व्हावे यासाठी मी जातीने प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे या समाजमंदिराला भ्रष्टाचाराची नव्हे तर सर्व कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांच्या श्रमाची वीट लागलेली आहे, हे वास्तू पाहून दिसून येते’, अशा शब्दात श्री.केळकर यांनी भावना व्यक्त केल्या.
       भाजपाचे खा.अमर साबळे यांनीही ओघवत्या शैलीत भगवान गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र उपस्थित जनसमुदायासमोर मांडले‘बाबासाहेबांनी भारतीय जनतेसाठी आणि देशासाठी खूप मोठे कार्य करुन ठेवले आहे. मात्र त्यांनी धम्मदिक्षा देेऊन आपणास कृतकृत्य केले आहे. भगवान गौतम बुध्द यांच्या विचारांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा जागर या समाजमंदिरात व्हायला हवा’, असे सांगत श्री.साबळे यांनी सुंदर वास्तु उभारल्याबद्दल आ.संजय केळकर यांचे आभार मानले.
कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष संदिप लेले, नगरसेवक मिलिन्द पाटणकर, नारायण पवार, कृष्णा पाटील, नंदा पाटील, दिपा गावंड तसेच बौध्द नागरिक सेवा मंडळाचे अध्यक्ष जयवंत मोहित, सचिव संतोष दाभाडे, खजिनदार मनोहर बच्छाव, अजित मोहिते आणि समाजमंदिर उभारण्यासाठी महत्वाचा दुवा ठरलेले संजिवनी बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समाजसेवक डी.के.जाधव, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि भाजपाचे विभागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.