Tuesday, June 2 2020 2:57 am

डेबिट-क्रेडिट कार्डची क्लोनिंग करून घातला गंडा – दोघे भामटे अटक

ठाणे :- हॉटेलमधील वेटर आणि पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांच्या डेबिट व क्रेडिट कार्डची क्लोनींग करीत बँक खात्यातून पैसे उडवणाऱ्या दोघा ठगांना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाबाज मोहंमद आरिफ खत्री उर्फ रेहान अली खान  आणि केशव पात्रो उर्फ रेड्डी उर्फ सरकार अशी या भामट्यांची नावे असून खान हा या घटनेतील मुख्य सूत्रधार आहे.या दुकलीने संपूर्ण भारतातील व दुबई येथील तब्बल 15 हजार कार्डाची क्लोनिग करीत कार्ड धारकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
 पोलिसांनी या दोघा आरोपींकडून कार्ड क्लोनिग करण्याच्या 3 स्कॅमर मशीन,लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या भामट्यांनी हा फसवणुकीचा धंदा 2007 पासून सुरू ठेवला असून त्यांनी आतापर्यंत हजारो नागरिकांचे कार्ड क्लोन करून त्यांच्या खात्यातून पैसे लंपास केले आहेत.या भामट्यांनी फक्त भारतातच नव्हे तर दुबईत देखील अशाच प्रकारे फसवणुकीचे प्रकार केल्याचे उघड झाले आहे.या टोळीतील आसिफ शेख, केशव रेड्डी उर्फ बाबू आणि मोहम्मद वरसुद्दीन अन्सारी या तिघा फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.हे तिघेही फरार भामटे मुख्य सुत्रधारास डेटा आणून देणे, एटीएममधून पैसे काढणे अशी कामे करीत असत.याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.