ठाणे -१५ : ‘देवमाणूस’ अशी समाजात ओळख असलेल्या नामांकित डॉक्टरांच्या प्रतिमेचा होर्डिंगवर वापर करून त्याचा ‘धंदा’ थाटण्याचा प्रकार रुग्णालयाकडून ठाण्यात सुरु होता. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवत महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. कॉन्सिलने याबाबत कडक ताशेरे ओढत डॉक्टरांना नोटीस बजावली होती. माञ एकीकडे डॉक्टरांना नोटीस बजावतानाच ‘होर्डिंगबाजी’ करणार्या ज्युपिटर रुग्णालयाला महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने अभय दिले आहे. याप्रश्नी कार्यवाहीबाबत कॉन्सिलने हात झटकले आहेत. माञ मनसेच्या पाठपुराव्यानंतर याप्रश्नी मार्गदर्शक सूचना तयार करण्याची विनंती महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने सरकारकडे केली आहे.
ठाण्यातील नामांकित रुग्णालय अशी ख्याती असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाने काही महिन्यांपूर्वी शहरात सर्वत्र होर्डिंग लावले होते. यामध्ये रुग्णालयाला १५ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत लावलेल्या जाहिरातीवर सुप्रसिध्द डॉक्टरांची छबी झळकली होती. नियमानुसार डॉक्टर, शिक्षक, वकील, लेखापरीक्षकांना जाहिरात करण्यास मनाई आहे. मात्र ज्युपिटर रुग्णालयाने या डॉक्टरांच्या फोटोला होर्डिंगवर स्थान देत रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला. मनसेच्या पत्रानंतर महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने दोन डॉक्टरांना जाहिरातबाजी बाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. माञ आता ज्युपिटर रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत मेडिकल कॉन्सिलने कानावर हात ठेवले आहेत. याबाबत संदीप पाचंगे यांना कॉन्सिलने पञ दिले असून भविष्यात जाहिरातीबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे नमूद करण्यात आले.
कारवाईचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने या पुर्वी जाहिरातबाजी करणाऱ्या रूग्णालयांना नोटीस दिल्या होत्या मात्र ज्युपिटर रूग्णालयाबाबतीत वेगळा निर्णय दिला आहे. कारवाईचे अधिकार महापालिकेला असल्याचे सांगत हात झटकले आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक संजय देशमुख यांनी शासनाकडून मार्गदर्शन घ्यायची गरज नसून नियमांनुसार कारवाई करणे अपेक्षित होते असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे.