Tuesday, June 2 2020 3:37 am

डीएलपीमधील रस्ते दुरूस्तींच्या खर्चाची वसुली करा;महापालिका आयुक्तांचे अधिका-यांना आदेश

ठाणे :- रस्ते दुरूस्तीची बिले भांडवली खर्चातून न काढण्याचे आदेश देतानाच कोणते रस्ते दोष दायित्व कालावधीमधील(डीएलपी) आहेत आणि त्याच्या दुरूस्तीसाठी किती खर्च केला याची माहिती सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज मुख्य लेखा व वित्त अधिकारी व नगर अभियंता यांना दिल्या.

शहरातील खड्ड्यांबाबत प्राप्त होणा-या तक्रारींच्या अनुषंगाने श्री. जयस्वाल यांनी आज सर्व अधिका-यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी शहरातील खड्ड्यांबाबत आढावा धेवून यापुढे प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा खड्डे भरण्याच्या कामाला लागावी असे सांगितले.

विशेषत: सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग यांनी आपापल्या विभागांशी संबंधित कामे प्राधान्याने करावी असे सांगतानाच श्री. जयस्वाल यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्ते दुरूस्तीची बिले भांडवली खर्चातून काढण्यात येवू नयेत असे आदेश दिले. तसे आढळल्यास संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

त्याचप्रमाणे शहरामध्ये कोणते रस्ते दोष दायित्व कालावधीमधील आहेत, त्या रस्त्यांवर किती खर्च झाला त्या सर्व रस्त्यांची यादी आणि त्याचा खर्च संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावा असे स्पष्ट केले.

याबैठकीत श्री. जयस्वाल यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना दिल्या तसेच पुन्हा पुन्हा धोकादायक इमारतींच्या संदर्भात पाहणी करावी व त्यानुसार कार्यवाही करावी असे सांगितले.