मुंबई, 9 :- आजच्या काळात ‘डिजिटल लिटरसी’ अत्यंत महत्त्वाची असून व्यापक समाजहितासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन’ यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल अॅकॅडमीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिस इंडियाच्या आरती श्रीवास्तव, आयआय केअर (IICARE) फाऊंडेशनचे डॉ. संतोष भोसले, कॉरपोरेट सोशल ‘रिस्पॉन्सिबिलिटी’चे उपाध्यक्ष अनुराग प्रताप, टी. एन. एस. इंडिया फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रूपा बोहरा, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी यार्डी, सिनीअर अॅनालिस्ट सलोनी दिलीप मंत्री, प्रोजेक्ट मॅनेजर सुप्रिया पालांडे, रॉयल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेककुमार पाटील तसेच समीर चिटणीस, सूर्यकांत माळकर यांच्यासह विद्या म्हात्रे, पूनम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाऊंडेशन यांनी कॅपजेमिनी कंपनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल ॲकॅडमी स्थापन करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आज जग अतिशय वेगाने बदलत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. या प्रक्रियेमध्ये ‘डिजिटलायझेशन’ व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या गोष्टींच्या आधारावरच आपल्याला आपली गती वाढविता येणार आहे. यामुळे रोजगाराचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर बदलते आहे. या वातावरणात प्रत्येक व्यक्तीला नवीन कौशल्ये शिकून स्वतःला अद्ययावत ठेवावेच लागेल. या ‘डिजिटल स्पेस’मध्ये खूप मोठ्या संधी आहेत. ४० टक्के रोजगार संधी या ‘डिजिटलायझेशन’ आणि तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यासाठी या क्षेत्राचा अनुभव, या क्षेत्रातील प्रशिक्षणही तरुणांना मिळाले पाहिजे.
‘डिजिटल लिटरसी‘साठी सेंटर्स महत्त्वपूर्ण
‘डिजिटल लिटरसी’साठी अशा प्रकारची सेंटर्स महत्त्वपूर्ण ठरतील. आधुनिक जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्वच क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीही अश्या प्रकारची सेंटर उपयुक्त ठरतील. अशा प्रकारची सेंटर्स या क्षेत्रातील इतर कंपन्यांसाठीही प्रेरणादायी ठरतील. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि कॅप जेमिनीचे व अन्य सहकारी संस्थांचे योगदान यामध्ये महत्त्वाचे ठरणार असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, या एक्सलन्स सेंटरमध्ये ‘कॅम्पस टू टेक्निकल करिअर्स (C2TC)’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. १८ ते २५ वर्षे या वयोगटातील वंचित तरुण-तरुणींना आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस असून मुली व महिलांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्याचे ठरविले आहे. विद्यार्थी म्हणून मिळणारे शिक्षण आणि इंडस्ट्रीला आवश्यक असलेला स्किल्ड वर्कफोर्स यामध्ये गॅप आहे. उमेदवार म्हणून नोकरी मिळण्यासाठी मुख्य अट असलेले शिक्षण विद्यार्थी पदवीतून प्राप्त करतात. पण, ‘जॉब रेडी’ मनुष्यबळ हवे असते ते शिक्षणातून मिळतेच, असे नाही. ही उद्योग क्षेत्राची तक्रार रास्त असते. यातून मार्ग म्हणजे पदवी मिळवतानाच ‘जॉब रेडी’ मनुष्यबळ घडविणे. या ध्येयातूनच डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल अॅकॅडमी स्थापन करण्यात येत आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल अँकडेमी
डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या माध्यमातून डिजिटल अकॅडेमी स्थापन करण्यात आली आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिसिस यांसारख्या हजारो नोकऱ्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रात सतत कर्मचारी हवे असतात. डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाऊंडेशन यांनी नामांकित कंपनी कॅपजेमिनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्स समजली जाणारी डिजिटल अकॅडेमी स्थापन केली आहे. डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात “जॉब रेडी” करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे.
डिजिटल अकॅडेमीमध्ये प्रशिक्षणार्थींना सर्व अद्ययावत उपकरणांनी युक्त अशी अत्याधुनिक लॅब उपलब्ध होणार असून कुठल्याही शाखेचे पदवी किंवा इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. प्रत्येक वर्गात ३५-४० विद्यार्थी यानुसार एकूण ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. १८ ते २५ वर्षे या वयोगटातील वंचित तरुण-तरुणींना आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. मुली व महिलांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. डोंबिवलीकर तरुणाईला कौशल्य विकासासोबतच रोजगाराची संधी मिळायला हवी यासाठी डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्यावतीने हा नवीन उपक्रम राबवण्यात येत असून या एक्सलन्स सेंटरमध्ये ‘कॅम्पस टू टेक्निकल करिअर्स (C2TC)’ हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हा उपक्रम सुरू करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डॉ. संतोष भोसले यांच्या ‘आयआयकेअर’ फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.