४८८ कोटी रुपयांची विकास कामे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावली – उमेश पाटील
ठाणे, 11 – कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचा विजय शंभर टक्के आहे म्हणून हुरळून जाऊ नका तर यश किती टक्क्यांनी मिळतो आहे याला महत्व आहे. यामुळे डाॅ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. असे मत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. तर कल्याण मतदारसंघात ४८८ कोटींची विकास कामे करणार्या डॉ.श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या खारीगाव पारसिक नगर येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दशरथ पाटील व उमेश पाटील हे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक दिनेश कांबळे, विभाग प्रमुख शाम पाटील, उपविभाग प्रमुख रवि नाटील उपविभाग प्रमुख नरेंद्र पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, भाजपचे सचिव चंद्रहास मोरे, मनसे शहरप्रमुख सुशांत सूर्यराव, कळवा मुंब्रा महिला आघाडी सहसंघटक रचना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या काळात काश्मीरमधील ३७० कलमाबाबतचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे. सर्वधर्मीयांसाठी एकच समान नागरी कायदा आणण्यात यावा, यासाठी मोदी सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या कामाबाबत फोन केला तर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची दखल घेत काम तडीस नेतात. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जितका निधी कल्याणमध्ये आणला तितका निधी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात आला नाही. श्रीकांत शिंदे संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करतात. विकासाला त्यांचे नेहमी प्राधान्य असते. यामुळे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या परिसराचा विकास केला आहे. ४८८ कोटींची विकास कामे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावली आहेत, यात खारीगाव-पारसिक परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. ४ तारखेला खासदार म्हणून निवडून आल्यावर डॉ.श्रीकांत शिंदे यांना खारीगाव पारसिक परिसरातील शिल्लक विकास कामांच्या सोडवणूकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. यामुळे येत्या २० मे रोजी कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्काने विजयी करुया, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी यावेळी बोलताना केले.