Tuesday, December 10 2024 8:35 am

डाॅ. आव्हाडांच्या विजयी चौकारासाठी वकील एकवटले

कळवा , मुंब्र्याला विकास काय असतो हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच समजले – एड. गजानन चव्हाण
आव्हान पेलण्याची क्षमता आव्हाडांमध्येच – एड. प्रशांत कदम

जे आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवत नाहीत; त्यांच्यावर जनतेने का विश्वास ठेवायचा ? – एड. प्रकाश भोसले

ठाणे, 10 – – पंधरा वर्षांपूर्वी जर आपण कळव्यात किंवा मुंब्र्यात आलो तर कुठल्याशा अविकसित गावात आल्याचा भास व्हायचा. पण, आता आपण कळवा – मुंब्रा गाठले तर इथून परत जावेसे वाटत नाही. एवढा विकास झाला आहे. या विकासाची ओळख फक्त डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा – मुंब्रावासियांना करून दिली आहे. त्यामुळेच आम्ही सर्व वकील डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी रहात आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ गजानन चव्हाण यांनी केले. तर, ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत तथा अप्पा कदम यांनी, ‘आव्हान’ पेलण्याची क्षमता फक्त “आव्हाड” यांच्यातच आहे, असे विधान केले. दरम्यान, जे लोक आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवू शकत नाहीत. त्यांच्यावर जनतेने का विश्वास ठेवायचा? आपण निष्ठावंत व्यक्तीलाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून कायम ठेवले पाहिजे, असे वक्तव्य ज्येष्ठ वकील प्रकाश भोसले यांनी केले.

ठाणे, कळवा, मुंब्रा येथील सुमारे २०० ते २५० वकिलांनी शुक्रवारी कळवा येथे विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस वकिलांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनादेखील आमंत्रित केले होते. या बैठकीमध्ये सर्व वकिलांनी एकमुखाने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवाय, आपले पक्षकार आणि सगेसोयरे यांनाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे काम समजवून सांगून मताधिक्य दीड लाखांच्या घरात नेण्याचाही निर्धार केला.

एड. गजानन चव्हाण म्हणाले, आज कळव्यातील पाण्याची समस्या मार्गी लागत आहे. सबंध ठाणे शहरातील सर्वात सुंदर नागरिकरण झालेला मुंब्रा – कळवा हा एकमेव मतदारसंघ आहे. कळवा, मुंब्रा ही दोन रेल्वे स्टेशन आजमितीला सबंध मध्य रेल्वेच्या मार्गावरील चांगली उदाहरणे आहेत. कावेरी सेतू, 90 फिट रोड , मुंब्र्यातील “मनीलेस हाॅस्पीटल”, रस्ते, उड्डाण पुल, स्मशाने, गॅस वाहिन्या कशातच डाॅ.जितेंद्र आव्हाड मागे पडलेले नाहीत. जितेंद्र आव्हाड हे विविध विषयांचे प्रचंड ज्ञान असलेली व्यक्ती आहे. एखादा प्रेमाने बोलला तर त्याच्यासाठी ते प्रेमानेच वागतील. पण, वाकड्यात गेला तर त्याला त्याची जागा दाखवतील, असे हे व्यक्तिमत्त्व संविधानावर प्रचंड प्रेम करणारे आहे. आपल्या या संविधानामुळेच आज आपण स्थिर आहोत; नाहीतर आपली अवस्थाही पाकिस्तान, श्रीलंका- बांगलादेशसारखी झाली असती, याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच ते संविधान निर्मात्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप असल्याचे जाहीरपणे म्हणतात. आपण भारतीय आहोत; हीच विचारधारा घेऊन जगणारे डाॅ. आव्हाड जातीभेदापलिकडे बंधुता जपत आले आहेत. जनतेसाठी 24×7 उपलब्ध असलेल्या जितेंद्र आव्हाडांना कितीही वाजता फोन केला तरी ते घेतात. आपल्याला आपला माणूस पंधरा वर्षापूर्वी भेटला आहे. हा माणूस यंदा दीड लाखांच्या मताधिक्याने आपल्या अधिक जवळ येईल, याची आपणाला खात्री आहे.
ठाणे न्यायलय बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. प्रशांत कदम यांनी, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा विजय नक्कीच आहे. पण, मागील वेळी 75 हजाराने झालेला विजय यंदा सव्वा ते दीड लाखाने झाला पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी सर्व वकील काम करतील. आपण आपल्या पक्षकार, नातलगांना आव्हाडांचे काम समजावून सांगू. जेणेकरून त्यांच्या मतांचा आकडा वाढला पाहिजे. फक्त विजय महत्वाचा नाही तर तो महाविजय असला पाहिजे. कारण आव्हान पेलणारे आव्हाड आहेत, असे म्हणाले.
एड. प्रकाश भोसले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, देशाचा आर्थिक आलेख घसरला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम राहण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जे मताधिक्य आपल्या मतदारसंघता मिळाले, त्याच्यात वाढ करण्याची जबाबदारी बुद्धीवादी म्हणून आपल्यासारख्या वकिलांची आहे. जो माणूस आपल्या नेत्यावर , पक्षावर विश्वास ठेव नाही; निष्ठा बाळगत नाही, असा माणूस मतदारसंघात कितीसा प्रामाणिक राहिल, असे म्हणत नाव न घेता विरोधकांची दांडी गुल केली.