Tuesday, November 12 2024 11:24 am

डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलं धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन

क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी

प्रत्येक बॉल मुख्यमंत्र्यांकडून सीमापार

ठाणे,16 :- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.

ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वेळात वेळ काढून मुख्यमंत्री या स्पर्धेला हजर राहिले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन त्यांना विनम्रपणे अभिवादन केले. एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास ज्या धर्मवीरामुळे शक्य झाला त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी परदेशात रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शक्ती स्थळाला आवर्जून भेट दिली. त्यांची ही कृती शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेम्भी नाका बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.