पालघर : जिल्ह्यातील डहाणूमध्ये आज सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ३.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूगर्भात ५ किलोमीटर खोल हा धक्का जाणवला. डहाणू तालुक्यात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणतव आहेत. डहाणू शहराच्या पूर्वेच्या भागत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसल्याने डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागाला कंप जाणवला होता.
अनेक नागरिक झोपेत असताना या धक्क्यामुळे भांडी, वस्तु पडल्याने खडबडून जागे झाले होते. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते, मात्र मागील पंधरा दिवसांपासून हे सत्र पुन्हा सुरू झाल्याने, या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत भूगर्भीय अभ्यास होत असून शासनाने या भागातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरण करण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र ही योजना अजूनही कागदावरच राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.