मुंबई,१४ : राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मोठा संप केला होता. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या संपात सहभागी होत मविआ सरकारवर टीका केली होती. एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते हेही डंके की चोट पे म्हणत आंदोलनात हिरिरीने सहभागी झाले होते. त्यावरुनच, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या आमदार आणि सदावर्तेना सडेतोड सवाल केला आहे.
जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला होता. त्यानंतर, अजित पवार यांनीही एका कार्यक्रमात पडळकर आणि सदावर्तेना लक्ष्य केलं. नाव न घेता त्यांनी या दोघांवर टीका केली.
दीड लाख कोटी रुपयांचा पगार वर्षाचा आम्ही करत होतो, ग्रामसेवकांचा, नर्सेसचा, डॉक्टरांचा, शिक्षकांचा कुणाचाच पगार कमी केला नाही किंवा उशिरा दिला, असं कधीच झालं नाही. राज्यात आमचं सरकार असताना, एसटी संपावेळी काही आमदार तिथं जाऊन आंदोलन करत होते, झोपतं होते. एक तर म्हणायचा डंके की चोट पे करूंगा, डंके की चोट पे करुंगा…. आता कुठं गेला डंका आणि कुठं गेली चोट असा सवाल अजित पवार यांनी केला.
राज्यातील एसटी बंद असताना 250 कोटी रुपयांचा पगार आम्ही केला. पण, माणसं कशी बदलतात बघा सरड्यासारखी. ह्यांच सरकार आलं की ही माणसं काही बोलायला तयार नाहीत. आम्ही सरळमार्गी आहोत, रोकठोक आहोत. पण, ह्यांनी स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून… असं असल्याचे अजित पवार म्हणाले. इतिहासात नाक खुपसू नका, प्रत्येक पक्षाने वाचाळवीरांना आवरले पाहीजे. सध्याचे वातावरण गढूळ झाले आहे. लोकांचे प्रश्न समजून घेत आरोप प्रत्यारोपापेक्षा समस्या प्रश्न सोडवले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत अजित पवार म्हणाले की, असं काहीतरी कानावर येतेय, तुम्ही काळजी घ्या, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरात यांना पूर्णपणे आदल्यादिवशी सांगितले होते. पण ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू, डॉ. तांबेंचाच अर्ज भरणार आहेत, असं बाळासाहेबांनी म्हटल्याचं चांगलं मला आठवतंय असं त्यांनी सांगितले.
पुण्याच्या नामांतरावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुणे हे मिनी इंडिया आहे. नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला हवा. उगाच बाहेरच्यांनी सल्ले दिल्याने अडचणीचं ठरते. कुणाबद्दल ही अनादर होणार नाही. सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.