कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार
अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
ठाणे, 13 : ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगापोटी देय असलेली थकबाकी त्वरीत देण्याची विनंती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिनांक 11/12/2023 रोजी लेखी पत्रान्वये आयुक्त अभिजीत बांगर यांना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेवून ठामपाच्या सेवेत कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगापोटीच्या थकबाकीचा पहिला हप्ता प्राधान्याने देणे तसेच 2016 नंतर ठामपाच्या सेवेत रुजु झालेल्या कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माजी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
ठाणे महापालिकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग हा जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला असून यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये मागील वर्षातील थकबाकीची रक्कम विविध टप्प्यामध्ये देण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत थकबाकीचा पहिला टप्पा जून 2023 मध्ये देय करुन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल् असे नमूद करण्यात आले आहे. परंतु सदरची मुदत उलटून 5 ते 7 महिन्याचा कालावधी झालेला आहे. याबाबत विविध कर्मचारी संघटनांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच लोकप्रतिनिधींकडे सातत्याने याबाबत मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना लेखी पत्र दिले होते.
त्यानुसार ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार दि. 01/01/2016 ते दि. 31/12/2022 पर्यंतचा फरक अदा करणे निश्चित करण्यात आले आहे. सदर सातव्या वेतनाच्या आदेशानुसार दि. 01/06/2019 ते दिनांक 31/12/2022 पर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीचे तीन समान हप्त्यामधील पहिला हप्ता ठाणे महानगरपालिकेतील कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांना प्राधान्याने रोखीने अदा करणेस आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्देश दिले आहेत.
तसेच ठामपाच्या सेवेत दिनांक 01/01/ 2016 ते 21/10/2021 पर्यत जे अधिकारी /कर्मचारी सेवेत दाखल झाले त्यांना त्यावेळी शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला असता तर त्यांची वेतनश्रेणी कमी होण्याची शक्यता होती. याबाबत वारंवार मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या अधिकारी / कर्मचारी यांचे नुकसान होवू नये यासाठी त्यांची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे असलेली वेतनश्रेणी संरक्षित करुन या वेतनश्रेणीनुसार त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.
या निर्णयामुळे ठाणे महापालिका अधिकारी / कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले आहेत.