ठाणे, 20 – ‘अस्तित्व संस्था ठाणे’ पुरस्कृत ‘उन्मुक्त कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेने पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव-2023 हा येत्या ८ व ९ जुलै या दोन दिवस शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात नाट्यरसिकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटकांचे व एकांकिकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सोमवारी १९ जून २०२३ रोजी ठाण्यातील वाल्मीकी सभागृहात ‘मुक्तायन’ नाट्य महोत्सवाचे ‘पहिल्या पोस्टर’ चे अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय सोनवणे यांच्यासह समता आंदोलनाचे कार्यकर्ते जगदीश खैरालिया आणि ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सवाच्या निमंत्रक अॅड. शिल्पा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उन्मुक्त कलाविष्कारचे सर्व कलाकार व सदस्य उपस्थित होते. यावेळी जगदीश खैरालियांनी मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले की नाटक हा विषय थेट प्रेक्षकांच्या मनाला हात घालतो, म्हणून समाजाला आरसा आहे. संजय सोनावणे म्हणाले की, माणसातला माणूस आज हरवत चाललेला आहे, पण उन्मुक्त कलाविष्कार या नाट्यसंस्थेने सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून समाजातील समस्या मानवतावादी दृष्टीकोनातून व्यवस्थेसमोर ठेवल्या आहेत.