Thursday, December 5 2024 5:59 am

ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुरूवर्य आनंद दिघे व्याख्यानमाला

ठाणे 29 – शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रथमच ९ आणि १० फेब्रुवारी रोजी गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, अक्षर पारसनीस, प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, प्राचार्य ऍड. सुयश प्रधान, मुख्याध्यापिका डॉ. वैदही कोळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विद्यालय आणि विधी महाविद्यालय, मेंटल हॉस्पिटल जवळ, ठाणे येथे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी हे `करिअर निवडताना…’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन हे `माणूस घडण्यासाठी…’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
धर्मवीर आनंद दिघे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा राजकारणाबरोबरच सर्वच क्षेत्रात वावर होता. साहित्यिक, खेळाडू, विश्लेषक यांच्याशी त्यांचे घनिष्ट नाते होते. ठाणे शहरात पूर्वी अनेक व्याख्यानमाला व्हायच्या, आताही होत आहेत. मात्र आनंद दिघे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरु व्हावी अशी आमची इच्छा होती. तिची आम्ही पूर्तता करत आहोत. आमच्या शाळेचे नाव देखील त्यांच्याच नावाने आहे, असे प्रदीप ढवळ म्हणाले.