Monday, March 8 2021 5:10 am

ठाण्यात फुटपाथच्या कामादरम्यान झाडाचा बळी ठेकेदाराचा मनमानी कारभार- मनसेकडून आंदोलनाचा इशारा

ठाणे : फुटपाथचे नूतनीकरण करताना ठेकेदाराने येथील झाड मुळासकट उपटून फेकल्याचा धक्कादायक प्रकार वागळे इस्टेट परिसरात घडला. या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून याबाबत ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसेने आवाज उठवला असून या ठेकेदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वागळे इस्टेट पोलीस ठाण्याजवळ असलेल्या प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरीसमोर फुटपाथच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. या कामादरम्यान फुटपाथशेजारी असलेल्या भल्या मोठ्या झाडावर ठेकेदाराने मनमानी पद्धतीने कुऱ्हाड चालवली. या झाडाचा बळी घेतल्यानंतर ठेकेदाराने खडी, रेती, सिमेंटच्या मदतीने झाडाचा बुधा असलेला खड्डाही बुजवून टाकला. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर सचिव सचिन सरोदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच या प्रश्नी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सरोदे यांनी निवेदन देत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

पंचनाम्यास टाळाटाळ :
ठेकेदाराने झाडाचा बळी घेतल्यानंतर पालिका प्रशासनाकडे याठिकाणचा पंचनामा करण्याची मागणी केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी बोटचेपी धोरण स्वीकारत पंचनाम्यास टाळाटाळ केली. आता डेब्रिज टाकून ठेकेदाराने झाडाचा खड्डाही बुजवला आहे. येत्या आठ दिवसात ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत न टाकल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनविसेचे ठाणे शहर सचिव सचिन सरोदे यांनी दिला आहे.