नागपूर, 13 – वाढत्या नागरीकरणामुळे ठाण्यात पाणीटंचाईची समस्या नेहमीच भेडसावत असते. यासाठी विहिरींचे पुनरुज्जीवीकरण गरजेचे आहे. या विहिरींबरोबरच नाले आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी नसल्याची बाब निदर्शनास आणून आमदार संजय केळकर यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
घोडबंदर परिसरात एकीकडे पाणी टंचाई नियमितपणे भेडसावत असताना दुसरीकडे या परिसरात ५०-५० मजल्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतींमध्ये राहायला येणाऱ्या हजारो रहिवाशांना पाणी कुठून देणार? कचरा डम्पिंग, रस्ते आदी सुविधा कशा पुरवणार असे प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केले.
ठाण्यात ८०० विहिरींपैकी ५५५ विहिरी शिल्लक असून त्यापैकी दीडशे विहिरी जुन्या ठाण्यात आहेत.
पाणी टंचाईची झळ कमी करण्यासाठी शहरातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. यासाठी ५० कोटींचा निधी शासनाने देण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली.
पावसाळ्यात नाले तुंबून परिसरात घरांमध्ये पाणी शिरते, त्यामुळे नाल्यांच्या साफसफाईबरोबरच हे नाले खाडीपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. शहरातील असे १६ नाले खाडी पर्यंत नेण्याची गरज असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने का होईना निधी मिळावा अशी मागणीही श्री.केळकर यांनी केली.
ढोकाळी-कोलशेत रस्त्याचे काम नऊ महिने बंद होते. त्यामुळे येथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पाठपुरावा केल्यानंतर हे काम सुरू झाले आहे. मात्र या रस्त्यात एमएसईबीच्या केबल, ट्रान्सफॉर्मर आदींचा अडथळा असून ते काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आयुक्तांनी याबाबत मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाला नाही तर या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होईल, अशी भीती श्री.केळकर यांनी व्यक्त केली आहे.
एक लाख एफएसआयची चोरी
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात मनमानी कारभार सुरू असून वादग्रस्तरीतीने मंजुऱ्या देण्यात येत आहेत. ठाण्यात प्राईम ठिकाणी एक लाख एफएसआयची चोरी करण्यात आली असून त्याला ठामपाच्या शहर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबत सुनावणी झाली असून तातडीने स्थगिती देण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली आहे. तर पाचपाखाडी येथे सिनेमागृहाला जागा देण्यात आली आहे. मात्र आता तेथे एफएसआय शिल्लक राहिला नसून तेथील सोसायटीतील शेकडो रहिवाशांना पुनर्विकास करता येणार नाही. या प्रकरणी शहर विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली.