Saturday, April 20 2019 12:28 am

ठाण्यात उंच इमारतीवरील परांची कोसळून आठ मजूर जखमी

पाच मजूर हायलँड रुग्णालयात,एक ज्युपिटरमध्ये तर,दोन जखमी सिव्हिल रुग्णालयात दाखल

ठाणे : ठाण्यातील रुणवाल गार्डन सिटी या इमारतीच्या बांधकामासाठी दीड वर्षांपूर्वी  बांधलेल्या बांबूच्या परांचीवर काम करण्यासाठी चढलेले आठ मजूर अचानक परांची  तुटल्याने थेट खाली पडून जखमी झाले.ही घटना सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.जखमी पाच मजुरांना बालकुमच्या हायलँड रुग्णालयात, एकाला ज्युपिटर तर,दोघे गंभीर मजुरांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्याने मजुरांना रुग्णालयात रिक्षाने नेण्याची नामुष्की ओढवली.याप्रकरणी,ठेकेदार दादा नाना कुंभार याच्यावर कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बाळकुम येथील रुणवाल गार्डन सिटीच्या इमारती पैकी ए-३ या १८ मजल्याच्या इमारतीच्या रंगकामासाठी दीड वर्षापूर्वी बांबूची परांची बांधण्यात आली होती.जुनाट आणि कमकुवत झाल्याने दीड वर्षानंतर ही परांची काढण्यासाठी कुंभार या ठेकेदाराचे मजूर सोमवारी सकाळी परांचीवर चढले आणि अचानक परांची कोसळून थेट खाली कोसळले. यात जखमी झालेल्या मजुरांमध्ये मोह्हमद राखिबुलह शेख (३०) , मोहम्मद रॉयल शेख (२१), जमाल शेख (५० ), हसन अली (२४), इक्तीयार युसूफ मोहहम्द (२०), दुलाल सिंग (३५), आणि मणीरुद्दीन शेख (२७ )यांचा समावेश आहे. सदर  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचले. दरम्यान जखमी रुग्णांना उपचारासाठी नेण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका उशिरा पोहचल्याने मजुरांना रिक्षातून नेण्यात आले. बाळकुमच्या हायलँड रुग्णालयात पाच जणांना,एकाला ज्युपिटर रुग्णालयात तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. इमारतीच्या रंगकामासाठी दीडवर्षापूर्वी कामासाठी परांची बांधण्यात आली  होती. ती काढलीच नसल्याने परांचीचे बांबू आणि बांधलेल्या रस्सी या कमकुवत झाल्याने हा प्रघात घडल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले.या प्रकरणात मजूर पडून जखमी होण्याच्या घटनेला जबाबदार ठरवून ठेकेदार कुंभार याच्यावर गुन्हा दाखल केला असून इतर दोषींवरही कारवाईचे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिले आहेत.