मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर
महापालिका आणि खाजगी शाळांचा सहभाग
ठाणे (१७) : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील १५० शाळा आणि त्यांच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर या अभियानात भर देण्यात आला.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांमधील मतदान केंद्रे, तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सर्व शाळांमध्ये सफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या ६२ शाळा, आणि ८८ खाजगी शाळा अशा १५० शाळांचा समावेश होता.
या मोहिमेची सुरूवात कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक १६ येथे करण्यात आली. या शाळेतील मतदान केंद्रांची सफाई करण्यात आली. तसेच, परिसरही स्वच्छ करण्यात आला. यावेळी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहायक आयुक्त सोपान भाईक आदी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या सफाई मोहिमेत सहभागी झाले.
सर्व मतदान केंद्र आणि परिसराची व्यवस्थित सफाई करण्यात यावी. तसेच, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या.