Saturday, January 25 2025 7:26 am
latest

ठाण्यातील हुक्का पार्लरवर धाडसत्र पुन्हा सुरू होणार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कारवाईचे आदेश..

ठाणे – 28 हर्बलच्या नावाखाली ठाणे शहरात हुक्का पार्लरचा धुमाकूळ सुरू असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले.

ठाणे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरविरोधात आमदार संजय केळकर यांनी गेल्या वर्षभरापासून मोहीम उघडली आहे. याबाबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. आता भाजप-शिंदे गटाचे सरकार असून मध्यंतरी ठाण्यात हुक्का पार्लरवर कारवाई झाली, परंतु ते पुन्हा सुरू झाल्याचे आमदार केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

ठाण्यात हुक्का पार्लर बेबंदपणे सुरू असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या पालकांनीही याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. या शहराला या व्यवसायामुळे डाग लागत आहे. या अनधिकृत व्यवसायावर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठोस कारवाईचे निर्देश दिले आहेत. हुक्का पार्लरवर या आधी कारवाया झाल्या आहेत. तरीही हे व्यवसाय सुरू असतील तर त्यावर नक्की कारवाई होईल, असे आश्वासन श्री.फडणवीस यांनी दिले.