Tuesday, December 10 2024 6:50 am

ठाण्यातील विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल!

ठाण्यातील विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल!

• डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन
• ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत डॉ. काकोडकर यांची मुलाखत
• ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

ठाणे (17) : क्रमिक अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि सुलभपणे विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतुहल निर्माण होईल. अधिक संख्येने विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतील. तसे विज्ञान केंद्र ठाण्यातही उभे राहणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मराठी विज्ञान परिषदेलाही महापालिकेने त्या प्रकल्पात सहभागी करून घेतले आहे. हे विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफताना केले. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी डॉ. काकोडकर यांची मुलाखत घेतली.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे विचारमंथन व्याख्यानमालेतंर्गत डॉ. अनिल काकोडकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. काकोडकर, त्यांच्या पत्नी सुयशा काकोडकर, समीर कर्वे यांचा सत्कार केला. याप्रसंगी, मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण आणि कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे यांचेही स्वागत आयुक्त श्री. बांगर यांनी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे हेही याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुलाखतीमध्ये डॉ. काकोडकर यांनी त्यांच्या बालपणापासूनचा प्रवास सांगितला. सन १९७४ आणि १९९८ मध्ये भारताने केलेल्या अणू चाचण्या, जगभरात उमटलेले त्याचे पडसाद, देशाचे संरक्षण आणि विकासासाठी अणूऊर्जेचा झालेला उपयोग याबद्दलचे विवेचनही डॉ. काकोडकर यांनी केले. तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगातून साध्य होणाऱ्या गोष्टींचाही उहापोहही केला. आधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायांच्या संधी ग्रामीण भागातील रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या तर देशाचा सर्वांगीण विकास होऊन महासत्ता होण्याचे आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

‘ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतमाल प्रक्रिया आणि अन्य व्यवसाय उपलब्ध झाले तर तिथून शहरात होणारे स्थलांतर थांबेल आणि पर्यायाने शहरांचे बकालीकरण कमी होईल. ग्रामीण भागातील कुटुंबांचे दरडोई उत्पन्न त्यामुळे वाढून त्यांचे जीवनमान सुधारेल,’ ही ‘सिलेज’ची (सिटी इन टु व्हिलेज) कल्पना डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट करून सांगितली.

देशाची वाढती उर्जेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा, पवन उर्जा आदी अपारंपारिक स्त्रोतांचा वापर करीत आहोत, परंतु विकास प्रक्रियेत अपरिहार्य असणारी पुरेशी ऊर्जा मिळविण्यासाठी अणूऊर्जेशिवाय आपल्यासमोर अन्य पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. काकोडकर यांनी केले.

मुलाखतीच्या उत्तरार्धात डॉ. अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

‘विज्ञान मंच’च्या बोधचिन्हाचे अनावरण
ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागावी, विज्ञानाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावे यासाठी ठाणे महापालिका मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते याच कार्यक्रमात करण्यात आले. तसेच, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना लिखाणाची संधी देणाऱ्या दृष्टी या विशेष अंकाचे प्रकाशनही डॉ. काकोडकर यांच्या हस्ते झाले. या अंकाची संकल्पना ठाणे वैभव या दैनिकाची असून प्रकाशनास निखिल बल्लाळ उपस्थित होते.