Thursday, December 12 2024 7:40 pm

ठाण्यातील विज्ञान केंद्राच्या कामास युद्धपातळीवर सुरूवात करणार : आयुक्त अभिजीत बांगर

विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासाठी आयुक्तांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांची भेट

ठाणे, 27 : राज्याचे मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेणे व याबाबतचा आराखडा व अनुषंगिक बाबींबाबतची चर्चा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच बैठक घेतली. या चर्चेदरम्यान ठाणे शहरातील नियोजित जागेवर विज्ञान केंद्र उभारण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करुन युद्धपातळीवर कामास सुरूवात केली जाईल, असा विश्वास यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाच्या विविध भागात प्रादेशिक विज्ञान केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. याचा लाभ निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल. यासाठी मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीसाठी डॉ अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना आयुक्त श्री. बांगर यांना केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. या बैठकीस मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे प्रा. ना. द मांडगे हे देखील उपस्थित होते.

ठाण्यामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुम विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे. यामध्ये 5 हजार चौ. मी जागेत प्रत्यक्ष प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना डॉ. अनिल काकोडकर यांनी बैठकीत केली. तसेच यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (National Counsil of Science Museum) व ठाण्यात कार्यरत असलेल्या मराठी विज्ञान परिषद यांचे सहकार्य घेवून प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर करण्यात येईल व यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या जलद गतीने व्हाव्यात यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कालबद्ध पध्दतीने सदर प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

या विज्ञान केंद्रात मुलभूत विज्ञान, भारतीय विज्ञान, कृषी जैविक शास्त्र, अवकाश विज्ञान, उर्जा आणि पर्यावरण, माहिती विज्ञान, विज्ञान शोधिका, तारामंडळ, विज्ञानवाटिका अशा सुविधा तसेच गोलाकार त्रिमिती चित्रपट संकुल, चित्रपट गृहसंकुल, नाविन्यपूर्ण हब, नोबेल म्युझिअम, कॉन्फरन्स सुविधा, शैक्षणिक इमारत, होस्टेल इमारत व फिरते विज्ञान प्रदर्शन आदी सुविधा असाव्यात असे डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी नमूद केले. या सर्व घटकांचा समावेश करुन विज्ञान केंद्र उभारणीबाबतचा आराखडा तयार करुन तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. ठाण्यामध्ये अशा प्रकारचे विज्ञान केंद्र साकारल्यानंतर ठाणे शहराबरोबरच ठाणे व पालघर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर व्यक्त केला. डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाण्यातील विज्ञान केंद्र उभारणीसाठी पुढाकार घेवून सहकार्याची भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत आगामी काळातही आपले सहकार्य मिळेल असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

ठाणे शहराचे ठिकाण हे शहर व ग्रामीण भागाच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. एका बाजूला संपूर्ण विकसित एमएमआर क्षेत्र तर दुसऱ्या भागात ग्रामीण तसेच आदिवासी पट्टा, त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील नागरिक व शालेय विदयार्थी यांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येईल असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. सदर विज्ञान केंद्राचे परिचलन महानगरपालिकेमार्फत होणार असून परिचलन खर्चाच्या दृष्टीने हे केंद्र स्वयंपूर्ण कसे बनेल याकडे विशेष लक्ष देण्याबाबतही बैठकीदरम्यान चर्चा झाली.