– कंपनीची बनावट कागपत्रे तयार करून फसवणुक केल्याचा आरोप
ठाणे, 25 बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीच्या दोन भागीदारांची फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम क्षेत्रातील मे. जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार सुनिल गंगाधर लिमये यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कळके यांना शुक्रवारी अटक केली.
मे. जोशी एंटरप्रायझेस ही कंपनी कौस्तुभ कळके यांनी सुरू केली होती. या कंपनीत २१ जुलै २०२२ मध्ये सुनिल लिमये आणि जयंतीलाल जैन हे दोघे भागीदार झाले. या कंपनीचे जुन्या ठाण्यात म्हणजेच नौपाडा, तीन हात नाका, चरई आणि पाचपखाडी भागात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या कंपनीतील भागीदारांमध्ये वाद झाले असून हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहचला आहे. कौस्तुभ यांनी कामिशा दानबहाद्दुर सिंह आणि सुंदरराज हेगडे यांनी आपसात संगनमत करून सुनील आणि जयंतीलाल यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी निवृत्ती करारावर त्यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या आणि ही कागदपत्रे बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप सुनील लिमये यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला. लिमये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत कौस्तुभ यांना शुक्रवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वकील मल्हार सरदेशमुख यांनी दिली.