Monday, January 27 2020 9:00 pm

ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटाचे घर;आ.केळकर यांचा पाठपुरावा

ठाणे :- झोपडपट्टी पूनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडपट्टीधारकांनाही 300 चौरस फुटाचे घर देण्याची मागणी आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मान्य केली. आ.संजय केळकर यांनी याबाबत विधीमंडळात चर्चा घडवून आणली होती, तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळे ठाण्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार विविध प्रकारच्या जमिनीवर 210 झोपडपट्ट्या वसल्या असून साडेनऊ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. झोपडपट्टीधारकांचे जीवनमान सुधारावे, त्यांना हक्काचे घर मिळावे  यासाठी एसआरए योजना अस्तित्वात आली. या योजनेंतर्गत झोपडपट्टीधारकांना 269 चौरस फुटाचे घर देण्यात येत होते. मात्र 2018 मध्ये मुंबईतील झोपडीधारकांना 300 चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना 269 चौरस फुटाचेच घर देण्यात येत होते. त्यामुळे ठाण्यात झोपडपट्टीधारकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याबाबत ठाणे मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळात ठाणेकर झोपडीधारकांची बाजू मांडली तसेच मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देऊन पाठपुरावा सुरु ठेवला होता.
मुंबई आणि ठाण्यात या योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या एफएसआयमध्येही तफावत असून ठाण्यावर अन्याय झाल्याची भावना वाढीस लागली होती. मुंबईत चार तर ठाण्यात तीन एफएसआय देण्यात येतो. शिवाय मुंबई आणि ठाण्यातील जमिनींच्या किमतीमध्येही फरक आहे. त्याचा लाभ मुंबईतील विकासकांना जास्त मिळतो. योजना राबवताना मुंबईत 51 टक्के झोपडपट्टीधारकांची संमती आवश्यक ठेवली आहे, ठाण्यासाठी मात्र 70 टक्के संमती ठेवण्यात आली आहे. ही योजना राबवताना ठाण्यावर अन्याय होऊ नये यासाठी ठाण्यात झोपडपट्टी रहिवासी संघटनेने भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवदेन दिले होते. आ. संजय केळकर यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ठाणेकर झोपडपट्टीवासींची बाजू मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडीधारकांना 300 चौरस फुटाचे घर देण्याची मागणी मान्य केली. अन्य अटीनियमही मुंबईप्रमाणेच ठेवण्यात येतील. आगामी नवीन विकास आराखड्यात (डीसीआर)याचा अंतर्भाव करण्यात येईल, असे श्री.फडणवीस यांनी श्री. केळकर यांना सांगितले. यावेळी श्री.केळकर यांनी तातडीने अधिसूचना काढण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली.
आ.केळकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने ठाण्यातील झोपडपट्ट्यांमधील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला असून त्यांनी आ.केळकर यांचे आभार मानले आहेत.