Monday, March 17 2025 11:17 pm

ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांनी दीपावली निमित्त अनुभवला आकाशकंदील आणि पणती पेंटिंगचा अनुभव

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वचा एक अनोखा अभिनव उपक्रम.

ठाणे 9 – आपण जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होत असतो… ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांसाठी आयोजित दीपावली आकाशकंदील आणि पणती पेंटिंग कार्यशाळेला उपस्थित सर्वच मान्यवरांनी काल हे अनुभवलं, निमित्त होत, शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व या ५७ वर्ष जुन्या सामाजिक संस्थेतर्फे दीपावली आकाशकंदील आणि पणती पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन.

यावर्षी हा उपक्रम विशेष होता, मंडळाच्या प्रथेप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ठाण्यातील कमलिनी कर्णबधिर शाळा आणि झवेरी ठाणावाला कर्णबधिर शाळेच्या अंदाजे १०० विद्यार्थ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन प्रा .श्याम धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने केले होते. यात या मुलांकडून पारंपारिक आकाशकंदील बनवून घेण्यात आला तसेच पणत्या पेंटिंग करून घेण्यात आल्या. यावर्षी ही सर्व मुलं त्यांनी या कार्यशाळेत स्वतः बनवलेले आकाशकंदील आपापल्या घरी लावून दीपावलीचा वेगळा आनंद लुटणार आहेत. यावेळी या कार्यशाळेतून या विशेष मुलांना त्यांच्या उपजिविकेसाठी आकाशकंदील व्यवसाय म्हणूनही पुढें उपयोगी ठरू शकतो असे श्री धुरी सरांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले.

मंडळातर्फे या कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना आणि उद्दिष्ट सांगताना, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री गिरीश राजे यांनी ” चायनीज किंवा रेडिमेड आकाशकंदीलाच्या या युगात, पारपरिक आकाशकंदील ही संकल्पना पुन्हा नवीन पिढीत पुन्हा रुजावी म्हणून या अशा कार्यशाळेची आज आवश्यकता आहे आणि हेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे म्हणून सांगितलं.

कार्यशाळेच्या समारोपनंतर आपण बनविलेले आकाशकंदील घरी नेताना सर्वच उपस्थित मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता, आणि कार्यशाळेचे उद्दिष्ट सफल झाल्याने मंडळाच्या सर्व सभासदांचा आनंद अवर्णनीय होता.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ रांगोळीकार श्री. महेश कोळी सर, चित्रकार श्री भगवान दास, संगीतकार श्री विशाल राणे, जाणता राजा या महा नाट्यातील कलाकार श्री नितीन आंबवणे, माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण, माजी नगरसेविका सौ मालती पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री हेमंत पमनानी, मुकुंद कुलकर्णी सामजिक कार्यकर्त्या सौ निर्मला काळे, झवेरी ठाणावाला ट्रस्टचे विश्वस्त श्री सिद्धार्थ जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कमलिनी कर्णबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माया कुलकर्णी यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल दोन्हीं शाळांच्या वतीनं आभार मानले.

या कार्यशाळेतील सहभागी कर्णबधिर मुलांकडून आकाशकंदील व पणती पेंटिंग करून घेताना कमलिनी कर्णबधिर शाळेच्या आणि झवेरी ठाणावाला कर्णबधिर शाळेचे शिक्षकवर्ग, ठाणे पूर्वतील सामाजिक कार्यकर्त्या सौ अल्पा प्रभावळकर, सौ राव, सौ मनीषा जोशी यांचे विशेष सहकार्य उल्लेखनीय होत.

मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुभाष परब, सचिव श्री सुभाष करंगुटकर, खजिनदार श्री अमित ताम्हनकर, सभासद श्री हेमंत प्रधान, श्री अक्षर पारसनीस, श्री लहू सावंत, श्री शंकर गौर, श्री अजित पेडणेकर यांनी या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष श्री अजय नाईक यांनी केले.