Monday, June 16 2025 10:14 pm

ठाणे शहरात नऊ तासात ९५.९४ मिमी पाऊस

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारीही ठाणे शहरात कहर सुरू ठेवला. नऊ तासात ९५.९४ मिमी पावसाची नोंद झाली असून यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही. तर ठाणे शहरातील सखल भागांसह अन्य पाच ठिकाणी पाणी साचले, एक ठिकाणी टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले तर दोन घटनांमध्ये झाडांच्या फांदया दोन दुकानांसह एक चारचाकी गाडीवर कोसळल्या आहेत.

शुक्रवारी प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती

गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरूच होता. याचदरम्यान सकाळी ८.३० ते सांयकाळी ५. वाजण्याच्या सुमारास म्हणजे नऊ तासात ९५.९४ मिमी पाऊस झाला. यामध्ये साडेबारा ते दीड या एक तासात २२.८६, तसेच दीड ते अडीच या तासभरात २१.०९ मिमी पावसाची नोंद झाली तर सकाळी साडे आठ ते साडेअकरा दरम्यान ४१.१४ मिमी पाऊस झाला. मात्र साडेअकरा ते साडेबारा या एक तासात अवघा २.२८ मिमी पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागांसह टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा,चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात,मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात पाणी साचले होते. या घटना सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यानच्या आहेत. तर सावरकर नगर येथे झाडाची फांदी दोन दुकानावर तसेच वसंत विहार येथे झाडाची फांदी चारचाकी गाडी पडली होती. याशिवाय दिवा बेतवडे गाव येथे टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले असून ते झाड कापून बाजूला करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.