Friday, December 13 2024 11:15 am

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड,  नरेश म्हस्के प्रचंड मतांनी विजयी होणार  

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विश्वास
ठाणे, 11 – ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना मानणारा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. २० तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून मतदार नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी पांचपाखाडी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना रामदास आठवले यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 
प्रचार फेरी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार डॉ. संजिव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,  माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
`जय भिम आहे आमच्या गाठिशी, मग आम्ही का उभे राहणार नाही नरेश म्हस्के यांच्या पाठिशी,’ अशी मिश्किल टिप्पणी करत रामदास आठवले म्हणाले की, धन्युष्यबाण हे चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत आमची तिन तास रॅली निघाली. अनेक वस्त्यांमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मला पूर्णपणे खात्री आहे ठाणे हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे त्यामुळे ठाण्याचा मतदार नरेश म्हस्के यांना मतदान करेल. 
संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या मुद्याचा रामदास आठवले यांनी चांगलाच यावेळी समाचार घेतला. विरोधकांकडे दुसरा कुठलाही मुद्दा आता राहिलेला नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले जे संविधान आहे ते पवित्र आहे. कुठल्याही धर्मग्रंथापेक्षाही त्याचा मोठा सन्मान आहे. धर्मामध्ये धर्मग्रंथाचा  सन्मान आहे. देशाचा विचार केला तर संविधानच हा आपला धर्मग्रंथ आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचा आदेश दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधानावर माथा टेकवून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक कामे पूर्ण केलेली आहेत जी काँग्रेसच्या काळात झाली नव्हती. नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचा विषयच येत नाही. जाणीवपूर्वक समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे असे बोलले जात आहे. खरे तर लोकशाही धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात आल्याची टीका रामदास आठवले यांनी केली.