ठाणे 16 : महापालिकेने ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील 150 मीटरचा संपूर्ण परिसर हा फेरीवाला मुक्त केला असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षावाल्यांना शिस्त लागावी व प्रवाशांना विशेषत: महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या जबाबदारी घेवून या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्यावेळी कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलीसांना दिले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसर हा कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहेच, परंतु या परिसरातील रिक्षावाल्यांच्या मुजोरीला आळा घालण्याची जबाबदारी ही पोलीसांची असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत नमूद केले. या बैठकीस वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, परिमंडळ उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात महापालिकेच्या नियमित कारवाई सुरू असल्यामुळे हा परिसर फेरीवाला मुक्त झाला असून ही शिस्त आजही कायम आहे. अशाच प्रकारची शिस्त ही रिक्षाचालकांना लागणे आवश्यक असून ही जबाबदारी पोलीसांची असून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलीसांनी देखील महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
रेल्वे स्टेशनमध्ये जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अशावेळी रिक्षाचालक इतरत्र रिक्षा उभ्या करुन थेट प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसून येते, याचा महिला व वृद्ध प्रवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कोणताही रिक्षाचालक रांगेशिवाय उभा राहणार नाही, व प्रवाशांना वेठीस धरणार नाही यासाठी या परिसरात सकाळी 8 ते 3 व दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत पोलीस कर्मचारी तैनात असतील या दृष्टीने नियोजन करुन त्याची नियमित अंमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात असेल तर नागरिकांनाही सुरक्षित वातावरण निर्माण होते, यासाठी दोन शिफट्मध्ये पोलीसांना ड्यूट्या लावाव्यात व रात्री 11 वाजेपर्यत पोलीस कर्मचारी असलेच पाहिजेत असेही त्यांनी नमूद केले. तसेच दरम्यान रात्री उशिरा 11 च्या आत जर रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले दिसले तर त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी सॅटिस पुलाखाली अंधार असतो, यासाठी या ठिकाणी विद्युत दिव्यांची सोय तात्काळ करण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून दोन दिवसांत याबाबत कार्यवाही केले जाईल असेही त्यांनी नमूद केले.
*रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याबाबत कार्यवाही व्हावी*
वागळे मेन रोड, रोड नंबर 22 व नितिन कंपनीकडे येणारा रस्ता व संपूर्ण शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला डेब्रीज पडलेले दिसून येत आहे. हे डेब्रिज प्रभाग समिती निहाय प्र्तयेक कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर उचलण्याची कार्यवाही करावी. यासाठी पथक निर्माण करुन वाहनांसह दोन कर्मचारी सकाळी 7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते रात्री 11 पर्यत नियुक्त करण्यात यावे, सदरचे वाहन या परिसरात दिवसभर फिरत राहील या दृष्टीने नियोजन करावे, जेणेकरुन शहरात कुठेही डेब्रीजचे ढिगारे दिसणार नाही. जर शहरात डेब्रीज आढळून आल्यास ते उचलले गेले नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त बांगर यांनी दिला.
*कंत्राटदार ऐकत नसेल तर कारवाई करा*
शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविणेबाबत कंत्राटदारांना कळविल्यानंतर जर कंत्राटदार दिरंगाई करत असेल तर तात्काळ कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व उपायुक्तांना दिले.