Tuesday, January 21 2025 4:54 am
latest

ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरण कामादरम्यान महापालिकेचाही सहभाग महत्वाचा : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 29: रेल्वेप्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या अंमलबजावणीची दिशा ठरविण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून हाती घेण्यात येणाऱ्या कामामध्ये महापालिकेचा सहभाग महत्वाचा आहे. रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची ये-जा सुलभ होईल व वाहतूक जलदगतीने होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी संबंधितांनादिल्या. या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्य प्रकल्प अधिकारी श्री. मिश्रा, महापालिकेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पापळकर आदी उपस्थित होते.

रेल्वे काय करणार आणि त्याची उपयुक्तता
ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असून सर्वात गर्दीचे स्थानक आहे. उपनगरीय गाड्यासह लांब पल्ल्याच्या गाड्या देखील मोठ्याप्रमाणावर थांबत असल्याने दैनंदिन 6.5 लाख प्रवासी प्रवास करतात. आज एक हजाराहून अधिक गाड्यांची ये-जा आहे. त्यामुळे सद्यस्थित असलेल्या 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व- पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षिततही राखली जाणार आहे. या डेकवर प्रवाशासांठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकिटघर, शौचालय आदी सेवासुविधा उपलब्ध असणार आहेत. सदरचा डेक हा ठाणे पश्चिम व पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडला जाणार आहे. तसेच रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दोन व चार चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, तीन ते चार व्यावसायिक इमारतीचे बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे.

स्थानकाची ऐतिहासिक माहिती देणारे वास्तुसंग्रहालय
देशातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 1850 मध्ये धावली. कोळशावर धावलेल्या रेल्वेची प्रतिकृती, त्याचबरोबर याचा संपूर्ण इतिहास नागरिकांना माहित व्हावा अशा स्वरुपाचे वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

रेल्वेस्टेशनच्या बाहेरच्या गर्दीसाठी उपाययोजना
रेल्वे स्टेशनमधून पुर्वेला 30 टक्के तर पश्चिमेला 70 टक्के प्रवासी बाहेर पडतात. ठाणे पश्चिमेला गोखले रोड व शिवाजी पथ या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. ही गर्दी होवू नये यासाठी हा परिसर फेरीवाला मुक्त करणे, तसेच पार्किंगच्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करुन देणे, त्या भागातील वाहतूकीच्या नियोजनाच्या पुर्नरचना अशा पध्दतीने करणे जेणेकरुन पादचाऱ्यांसाठी रेल्वेस्थानकाबाहेर चालण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होवून परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल या दृष्टीने करावे असे श्री. बांगर यांनी नमूद केले.
सद्यस्थितीत ठाणे पूर्व येथे सॅटिसचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण हा पश्चिमेकडील बाजूस येत आहे. ठाणे पूर्व येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 ते 10 महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल, त्याचबरोबर पुर्वेला बस टर्मिनन्सचा प्रस्ताव आहे, त्यानुसार पुल व बस टर्मिनस पूर्ण झाल्यावर पुर्वेकडील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

सदर बैठकीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली, आणि वाहतूक उपायुक्त यांचेसोबत पुढील बैठकीचे आयोजन करुन धोरण अंतिम करण्यात यावे व तसा अहवाल महापालिका आयुक्त श्री. बांगर यांचेसोबत पुन्हा बैठक घेवून सादर करण्यात यावा असे या बैठकीत ठरविण्यात आले.