ठाणे 16 – दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे – मुलुंड दरम्यान नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवे रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे, ठामपा, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसेच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या सोबत पाहणी करण्यात आली.
त्यावेळी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोधे, आसावरी मॅडम, मध्य रेल्वेचे प्रकल्प निर्माण विभागाचे उप मुख्य अभियंता रिजवान अहमद, कार्यकारी अभियंता सतीशचंद, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश परदेशी, तहसीलदार मंडळ अधिकारी शशिकांत जगताप तसेच माजी नगरसेवक संजय दळवी, सहसचिव संजीव कुलकर्णी, युवासेना अधिकारी किरण जाधव विभागप्रमुख स्वप्नील शिरकर, प्रकाश पायरे, अशोक जाधव, प्रतीक राणे, प्रशांत सातपुते, राजू शिरोडकर, प्रदीप पूर्णेकर, शाखाप्रमुख रमेश शिर्के, अमोल हिंगे, नाना सावंत व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. १६ एप्रिल १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या रेल्वे स्थानकात सुरू झाली होती. आज १७० वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील सर्वाधिक गर्दीचे ठाणे स्थानक गणले जात आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज ७ ते ८ लाख प्रवासी ये-जा करीत असतात. आता प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत ठाणे महानगरपालिकेने २००८ मध्ये इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार केला. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
सन २०१४ साली राजन विचारे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात दि. ११ ऑगस्ट २०१५ रोजी शून्य प्रहर मार्फत त्यांनी लोकसभेत ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशनचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास तत्वतः मान्यता देण्यात आली त्यानंतर डिसेंबर २०१५ रोजी तत्कालीन ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल असताना ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामास स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून या कामास २८९ कोटी निधीही उपलब्ध करून घेतला.
सलग रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे बैठका व पत्रव्यवहार करून दि. २७ मे २०१६ रोजी मध्य रेल्वेची या नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळवली.
त्यानंतर जागेसाठी पाठपुरावा सुरू केला ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन अनेक प्रस्ताव शासकीय आरोग्य विभागाकडे ठेवण्यात आला. सन २०१० साली एक जनहित याचिका दाखल असल्यामुळे सदर जागेचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट असल्याने जागा मिळण्यास विलंब लागत होता.
सन २०१८ रोजी ठाणे महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाकडे जागे संदर्भात दिलेल्या आदेशात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. संदर्भात राज्य शासनाचे अॅड. जनरल यांच्यासोबत अनेक बैठका संपन्न झाल्या व दि.०३ मार्च २०२३ रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती उठवून स्थानकाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
दि. १९ एप्रिल २०२३ रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. परंतु मोजणी सुरु न झाल्याने खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मोजणी करण्याचे कळविले. त्यानंतर संबंधित विभागाने रेल्वे स्टेशन फलाटे व इमारतीसाठी लागणारी 3.77 एकर जागेची मोजणी करून घेतली. त्यानंतर पुन्हा शासकीय आरोग्य विभागाने जागेवर असलेल्या अतिक्रमणाचा विचार करून मनोरुग्णालयाच्या जागेची संपूर्ण मोजणी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळविले.
आज या पाहणी दौऱ्या दरम्यान खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून तात्काळ मोजणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच मोजणी होईपर्यंत रेल्वे व ठाणे महापालिका या मधील करारनामा तात्काळ मंजुर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या जेणेकरून ठामपाकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेला निधी रेल्वेला रक्कम भरून स्थानकाच्या इमारतीचे व रुळाचे काम सुरू करता येऊ शकेल अधिकाऱ्यांनी १५ दिवसात करारनामा करून देऊ असे सांगण्यात आले.
तसेच कोपरी आनंद नगर दिशेला उतरणारे पादचारी पूलालगत असलेल्या डी पी रस्त्याचे काम तत्काळ सुरु करा जेणेकरून कोपरी आनंद नगर परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण २० पैकी ११ पिलरचे काम पूर्ण झाले असून गर्डर व सॅटीस डेक चे काम सुरु असून ३५ टक्के काम पूर्ण झाले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन नवे रेल्वे स्थानक प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कसे असणार नवीन विस्तारित नवे ठाणे रेल्वे स्थानक
• संपूर्ण ठाणे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला +२ मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.
• या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.
• या स्थानकात तीन पादचारी पुल असणार आहेत.
• परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.
• स्टेशन इमारती समोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस असणार आहे
• 2.5 एकर जागेमध्ये चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.
• त्यामध्ये स्टेशनला जोडणाऱ्या 3 मार्गीका,
• पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेज च्या मागून अप -डाऊन असणार आहेत त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.
• दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.
• तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.
• तसेच नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याण च्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.
• ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.