Saturday, July 11 2020 10:42 am

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा 18 जानेवारीला

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणा-या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वा. महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. आर्य क्रिडा मंडळ, महागिरी कोळीवाडा येथे होणा-या कुस्ती स्पर्धेतील पैलवानांना प्रोत्साहन देवून उत्साह वाढविण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

          ठाणे महापालिका गेल्या अनेक वर्षापासून विविध खेळातील खेळाडूंना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. कुस्ती हा आपल्या मातीतील खेळ. या खेळाची माहिती भावी पिढीला होवून त्याबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोनदिवस चालणा-या कुस्ती स्पर्धेचा समारोप 19 जानेवारी रोजी सायं. 7.00 वा. होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाबरोबरच उपमहापौर  पल्लवी कदम, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, नगरसेविका नम्रता कोळी यांचे देखील सहकार्य लाभले आहे. राज्यस्तरीय असलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या पैलवानाला प्रथम क्रमांकांचे 1,25,000/- रुपये व ठाणे महापौर केसरी हा किताब, चांदीची गदा व सन्मान पट्टा प्रदान करण्यात येणार आहे.  तरी दवितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकास अनुक्रमे 75000/- रुपये, 60,000/- रुपये व 40,000/- हजारांचे रोख पारितोषिक  व सन्मान चषक प्रदान करण्यात येणार आहे.

     राज्यस्तरीय ‍ महिला गटासाठी प्रथम क्रमांकाचे 75,000/- रुपये व सन्मान पट्टा देण्यात येणार आहे. तर  दवितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे 40,000/-, 20,000/- व 10,000/- हजारांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटासाठी प्रथम 10 हजारांचे ‍ पारितोषिक व दिवतीय 7500/- व  तृतीय, चतुर्थ क्रमांकासाठी 3 हजारांचे पारितोषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पुरूष व  महिला असे 300 जणांना अद्यापपर्यत नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थीत रहावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.