Wednesday, February 26 2020 8:41 am

ठाणे महापौर चषकचित्रकला स्पर्धा 23 जानेवारीला सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे -महापौर

ठाणे : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे कलाक्रिडा महोत्सवातंर्गत ‘ठाणे महापौर चषक चित्रकला स्पर्धा’ येत्या 23 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

23 जानेवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस. व्यंगचित्रकार अशीही बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आहे, त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा व नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी याच ‍दिवशी ठाणे महापौर चषक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

या वर्षी सुध्दा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. गट क्रमांक 1 हा 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा गट असून या गटासाठी मी व ‘माझी आजी/ आजोबा नाना- नानी पार्कमध्ये’, ‘आम्ही किल्ला बनवितो’,  ‘माझ्या स्वप्नातील ठाणे’, ‘माझ्या परिसरातील उद्यान’ हे विषय देण्यात आले आहेत. गट क्रमांक 2 हा 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गट असून या गटासाठी ‘आम्ही समुद्रकिनारी फिरायला जातो’, ‘माझा ठाणे परिवहन बसमधील प्रवास’, ‘ठाण्यातील ऐतिहासिक वास्तू’, ‘मेट्रो प्रकल्प’ हेविषय देण्यात आले आहेत. तर महाविद्यालयीन गटासाठी ‘महाराष्ट्रातील गडकिल्ले’, मोबाईलचे दुष्‍परिणाम’, ‘महिलांचे स्वसंरक्षण काळाची गरज’, ‘मेट्रो प्रकल्प’ हे विषय ठेवण्यात आले आहे.

शालेय गटातील स्पर्धा ही ठाणे महापालिका शाळा व खाजगी शाळा या दोन गटात होणार आहे. तिन्ही गटांसाठी प्रथम, दवितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ  पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अनुक्रमे 15 हजार, 12 हजार व 10 हजार व दोन उत्तेजनार्थ 8 हजार अशी रोख रकमेची  पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी सर्व महापालिका शाळा व खाजगी शाळांतील मुख्याध्यापकांनी त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त्त सहभागी करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.