Thursday, December 12 2024 7:38 pm

ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्यकेंद्रात ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण’ मोहिम सुरू

शून्य ते 5 वयोगटातील सर्व बालकांची लसीकरण करुन घ्यावे –आयुक्त अभिजीत बांगर

· 12 ऑगस्टपर्यत आरोग्‌यकेंद्रात 779 अतिरिक्त सत्राचे आयोजन
· गर्भवती मातांनी लसीकरण करुन घ्यावे
· 90% पेक्षा अधिक लसीकरणाचे ध्येय निश्चित

ठाणे 08 : मा. पंतप्रधान यांच्या आदेशान्वये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम म्हणजेच Intensified Mission Indradhanush 5.0 ही लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या मोहिमेस 7 ऑगस्टपासून सुरूवात झाली असून दिनांक 12 ऑगस्टपर्यत ही मोहिम महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्‌यकेंद्रात या सर्व लसी मोफत दिल्या जाणार असून या मोहिमेचा लाभ 0 ते 5 वयोगटातील बालकांनी व गर्भवती मातांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्‌त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी अतिजोखमीच्या क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे सर्वेक्षण करीत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या भागामध्ये झोपडपट्टया, मायग्रेशन कन्स्ट्रक्शन साइटस्, वीट भट्ट्या, पोलिओचे अति जोखमीचे भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमातंर्गत कमी कव्हरेज असणारे विभाग इ. ठिकाणी सर्वेक्षया करुन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालके व गर्भवती मातांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात अद्यापपर्यत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 7736 बालकांचे व 1481 गर्भवती मातांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे माहिती माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिले. या विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत प्रत्येक आरोग्यकेंद्रात सहा कामकाजाच्या दिवसांमध्ये 779 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन केले जाणार आहे. जेणेकरुन ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात संपूर्ण लसीकरणाचे प्रमाण 90% पेक्षा अधिक करण्याबाबत ध्येय निश्चित करण्यात आले असल्याचे डॉ. राणी शिंदे यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची विशेष मोहिम राबविताना लसीकरणानंतर बाळाला ताप येणे, इंजेक्शनच्या जागी गाठ येणे आदी बाबींचा समावेश आहे. लसींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण अत्यंत किरकोळ असून या कारणांसाठी आपल्या बाळाला लस न देणे योग्य नाही. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लसी बालकांचे क्षयरोग, काविळ, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, गोवर, हिमोफिलस, इन्फल्युएंझा बी या जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करीत असून बाळाला लसीकरणापासून वंचित ठेवू नये असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल यांनी केले आहे.