*पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग महत्वाचा*
ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (22 एप्रिल) वसुंधरा दिन (Earth Day) उपवन तलाव येथे साजरा करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जात असून यासाठी स्वयंसेवक म्हणून नागरिकांनी संवर्धनाच्या कामात सहभागी व्हावे असे आवाहन करीत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी हरित जीवनशैलीचा स्वीकार करा असेही नमूद केले.
तामण हे महाराष्ट्राचं राज्य फुल वृक्ष आहे. या झाडाचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पुढील कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमात सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरण दक्षता मंडळाबद्दल माहिती दिली. तर ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त अनघा कदम यांनी महागरपालिकेसोबत सर्वसामान्यांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे हे सांगून संस्था नवीन पिढीला पर्यावरण रक्षणात सामील करत आहे त्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
“इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट”ही यावेळच्या वसुंधरा दिनाचे सूत्र होते. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड़ थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी यांनी दिली.
येऊरचं जंगलाच्या पायथ्याशी उपवन तलाव वसले आहे. तलाव परिसंस्थेत पाणी हा मुख्य घटक असतो. त्याचप्रमाणे पाण्याची खोली, स्वच्छता, तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, कार्बनडायओक्सडचे प्रमाण, पाण्यातील जैविक घटक यावर तलावातील जैवविविधता अवलंबून असते. यावेळी काटेसावर, शिवजटा, कळंब, जांभूळ, पुत्रंजिवा, करंज अश्या झाडांची माहिती या दिनानिमित्त सर्वसामान्यांना देण्यात आली. हि निसर्ग भटकंती निसर्ग अभ्यासक शुभम निकम, सोमनाथ कंग्राळकर, मेधा कारखानीस, हेमलता चंद्रशेखर आणि पौर्णिमा शिरगावकर यांनी दिली.
महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या विद्या सावंत यांनी आपल्याकडील सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरु आहेत का ते वेळोवेळी बघावेत जेणेकरून स्वच्छता राखली जाईल असे सांगितले. यानंतर सर्वानी “माझी वसुंधरा माझी जबाबदारी हि वसुंधरा संवर्धनाची शपथ घेतली. या कार्यक्रमात 70 वसुंधरा प्रेमी उपस्थित होते. तसेच स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत् माजिवडा नाका व विटावा नाका येथे धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी “Mist Fountain” हि प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यामुळे साधारण 2000 चौ.मी परिसरातील PM2.5 आणि PM10 या धुलिकणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असे नमूद केले.